स्वयंसेवी संस्थाकडून ट्रक भाजीपाल्यासह विविध साहित्य इस्काॅन च्या अन्नछत्रासाठी देण्यात आले
पिंपरी(वास्तव संघर्ष) :-पिंपरी चिंचवड शहरात लाॅकडाऊनमुळे भोजन व अन्नधान्य घेवू न शकणाऱ्या मजूर व कामगारांना शहरातील विविध स्वयंसेवी संस्थाकडून सहाय्य करण्यात येत असून त्याअंतर्गत प्राप्त झालेल्या एक ट्रक भाजीपाल्यासह विविध साहित्य इस्काॅन च्या अन्नछत्रासाठी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरात अकरा ठिकाणी उभारलेल्या निवारा केंद्रांच्या सह विविध भागांत अन्नधान्य उपलब्ध नसणाऱ्या व जेवणाची व्यवस्था नसणाऱ्या नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन विविध सेवाभावी संस्थांना केले होते. त्या अन्वये अनेक संस्थांनी इंद्रायणीनगर भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात साहित्य जमा केले आहे. त्या आवाहना अंतर्गत प्राप्त एक ट्रक भाजीपाला आज इस्काॅन संस्थेकडे सूपूर्त करण्यात आला.यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,संदीप खोत सहाय्यक आरोग्य अधिकारी बीबी कांबळे ओमप्रकाश बहीवाल आदी उपस्थित होते.
दरम्यान, बाराशे नागरिकांसाठी प्रत्येकी ३ किलो तांदूळ,एक किलो तूरडाळ ,गोडेतेल,एक किलो बटाटा व मिरची मसाला असे साहित्य आज जमा केले असून त्याचेही वितरण विविध ठिकाणी करण्यात आले.आणखी आठशे नागरिकांसाठी साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे क्रेडाई पुणे मेट्रोचे अनिल फरांदे व संतोष कर्नावट यांनी सांगितले.