बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राच्या प्रमुखपदी श्री. मनोजराव देवळेकर यांची नियुक्ती जाहीर

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या केंद्राच्या प्रमुख पदावर श्री. मनोजराव देवळेकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. ज्ञान प्रबोधिनीच्या प्रथेप्रमाणे वर्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आंतरजालाच्यामाध्यमातून (इंटरनेट) घेण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. वा. ना. अभ्यंकर यांनी या कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर केली. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीशराव बापट यांनी पाठविलेल्या लेखी नियुक्तीचा संदर्भ देत ही घोषणा करण्यात आली.

यावेळी बोलताना भूतपूर्व केंद्रप्रमुख डॉ. वा. ना. अभ्यंकर यांनी ज्ञान प्रबोधिनीची विकसित झालेली बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठीची शिक्षण प्रणाली सर्वांसाठी विकसित करण्याचा हेतू स्पष्ट केला. देशसेवा करू शकणारे सामर्थ्यवान युवक युवती घडावेत यासाठी प्रबोधिनीची शाळा या भागात आपण चालवत आहोत हा मूळ हेतू यापुढील कार्यसंचाने लक्षात घेतला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ज्ञान प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांनी आपल्या कामातून स्वतःला सामर्थ्यसंपन्न करायचे आणि आपली सामर्थ्यशक्ती देशाची सेवा करण्यासाठी वापरायची आहे असे मार्गदर्शन त्यांनी केले.

मनोज देवळेकर हे ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे येथील माजी विद्यार्थी असून पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून ते निगडीच्या कामात सहभागी झाले. सुरुवातीच्या काळात युवक संघटन आणि त्यानंतर क्रीडा क्षेत्रात अभिनव प्रयोग त्यांनी केले. क्रीडाकुल हा खेळाडू घडविणाऱ्या शाळेचा प्रयोग त्यांनी उभा केला. गेली २२ वर्षे क्रीडाक्षेत्रातला हा प्रयोग यशाची अनेक शिखरे गाठतो आहे.

मनोजराव देवळेकर यांनी ही जबाबदारी स्वीकारताना आदरणीय वा ना अभ्यंकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुढील कार्यासाठी नव्या उर्जेने सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन केले.

या कार्यक्रमाचा समारोप ज्ञान प्रबोधिनीचे संचालक वाच. गिरीशराव बापट यांनी केला. वाच. वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि यापुढेही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध राहावे अशी विनंती त्यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे आंतरजालावरून प्रसारण करण्यात आले. त्यासाठी कल्पेश कोठाळे, आरती बिजुटकर यांनी परिश्रम घेतले.

Share this: