खून करून फरार असलेल्या रावण टोळीच्या सदस्याला पोलिसांनी केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांच्या गुन्हेगाराच्या यादीतील व खून करून दिड वर्षांपासून फरार असलेल्या कुप्रसिद्ध रावण टोळीच्या सदस्याला आज (दि.7) गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने हडोळती, जिल्हा लातूर येथून अटक केली आहे.
आकाश विजय पवार (वय. 24 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आकाश हा रावण टोळीचा सदस्य असून त्याने 5 ऑक्टोबर रोजी रात्री देवीची आरती पाहताना झालेल्या वादातून अमित सुभाष पोटे याचा कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला होता. या खुनाच्या घटनेनंतर तो फरार झाला होता. तब्बल दिड वर्ष पोलिसांना गुंगारा देत तो लातूर येथे जाऊन लपून राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश लातूर जिल्हा, तालुका अहमदपूर येथील हडोळती या गावात राहत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीस शिपाई शामसुंदर गुट्टे यांना मिळाली. बाळकृष्ण सावंत यांनी या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोमारे, पोलिस शिपाई फारूक मुल्ला बहिरट व गुट्टे यांचे पथक लातूर येथे रवाना केले. या पथकाने आकाशला हडोळती येथून अटक केली आहे.आरोपी आकाशने त्याचा गुन्हा कबूल केला असून त्याला पुढील तपासासाठी चिंचवड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांनी गुन्हे शाखा युनिट 5 च्या अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे