दिवंगत दत्ताकाका यांच्या जयंतीनिमित्त ‘रक्तदान शिबीराचे आयोजन ;यश साने यांनी जपला सामाजिक वारसा
चिखली परिसरात साने परिवाराकडून विविध सामाजिक उपक्रम
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृह विरोधी पक्षनेता म्हणून गाजवणारे आणि राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ दिवंगत . दत्ताकाका साने यांचा सामाजिक वारसा आता त्यांचे चिरंजीव यश दत्ताकाका साने चालवत आहे . वडील दत्ताकाका यांच्या जयंतीनिमित्त चिखलीत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर यश साने यांनी आपल्या पित्याच्या पावलावर पाउल टाकत सामाजिक वारसा पुढे चालवला आहे. करुयात रक्तदान…वाचवुयात प्राण…असा संदेश देत यश साने यांनी नागरिक व कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. गुरूवारी, दि. १३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० दुपारी ५ वेळेत शिबीर होणार आहे. चिखलीतील मोरेवस्ती, अंगणवाडीसमोर, सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक ९२ येथे हे रक्तदान शिबीर होणार आहे. स्व. दत्ताकाका साने प्रतिष्ठान आणि कार्यकर्त्यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
दत्ताकाकांनी शेवटपर्यंत शब्द पाळला…
अखेरपर्यंत लोकांसाठी झटणाऱ्या दत्ताकाका साने यांनी शहरातील शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, रेडझोन यासह शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत स्वत: चा वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार केला होता. शेवटपर्यंत दत्ताकाकांनी हा शब्द पाळला. मात्र, सामाजिक उपक्रमांनी दत्ताकाकांची जयंती साजरी करण्यासाठी आता यश साने यांनी पुढाकार घेतला आहे.