क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील डी वाय पाटील रुग्णालयाचा प्रताप ;जन्माला आला मुलगा आणि बाळाच्या आईला दिली मुलगी

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडल्याचा प्रकार समोर आला आहे .पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जन्म दाखल्यावर बाळाची मुलगा म्हणून नोंद आहे. आणि डीवाय पाटील रुग्णालयाने बाळाच्या आईला मुलगी दिली. रुग्णालय प्रशासनावर बाळाच्या नातेवाईकांनी बाळ बदलल्याचे आरोप केले आहेत. तर रुग्णालय प्रशासनाने पालकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरीमधील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात 11 ऑगस्टच्या रात्री रिटा जगधने या महिलेची प्रसूती झाली. ज्यावेळी रिटा यांची प्रसूती झाली, त्यावेळी त्यांची आई हिराबाई नवपुते या त्या ठिकाणी उपस्थित होत्या. प्रसूती झाल्यावर त्यांना रुग्णालयामधील नर्स स्टाफने तुमच्या मुलीची प्रसूती झाली असून त्यांना मुलगा झाला असल्याचे हिराबाई नवपुते यांना सांगण्यात आले.

तसेच बाळाची प्रकृती नाजूक असल्याने बाळाला काही दिवस काचेत ठेवावे लागेल, असेही हिराबाई यांना सांगण्यात आले. मग कागदावर अंगठा देऊन त्या बाहेर आल्या. हिराबाईंनी बाहेर येताच बाळाचे वडील अनिल जगधने यांना मुलगा झाल्याची खुशखबर सांगितली.

दुसऱ्या दिवशी महापालिकेकडे करण्यात येणाऱ्या जन्म नोंदणीच्या दाखल्यावर मुलगा अशी नोंद करण्यात आली. पुढील चार दिवस रुग्णालयातील नर्स बाळाच्या आईकडून दूध घायच्या आणि काचेत ठेवलेल्या बाळाला पाजायच्या.

बाळाच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने बाळाला 15 ऑगस्ट रोजी आईकडे देण्यात आले. बाळ हातात आल्याच्या आनंदात संपूर्ण कुटुंब असताना बाळाने शी केली आहे का? हे बघितले असता आपल्या हातातील बाळ मुलगा नसून मुलगी असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर बाळाची आजी हिराबाई यांनी तातडीने रुग्णालयाला याचा जाब विचारला. तेव्हा रुग्णालयाने त्यांना खोटं ठरवायला सुरुवात केली. रुग्णालयातील प्रत्येक कागदावर मुलगी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं.जन्म दाखला नोंदणीच्या अर्जावर मात्र, रुग्णालयाने उडवाउडवीची उत्तरं दिली, असे आरोप नातेवाईकांनी केले आहेत.

प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत देशपांडे यांनी, “रुग्णालयाच्या प्रत्येक नोंद वहीमध्ये मुलीची नोंद आहे.” असे म्हणत कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळून लावले. जन्म दाखल्यावर असलेल्या मुलाच्या नोंदीबाबत त्यांच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हते. ज्या नर्स त्या दिवशी ड्युटीवर होत्या, त्या आज रजेवर असल्याची सारवासारव रुग्णालयाकडून करण्यात आली आहे

Share this: