क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला तळेगाव पोलिसांनी जळगावातून केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :- पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी जळगावातून अटक केली आहे . 4 ऑगस्ट 2020 रोजी भर दिवसा दुपारी तीन वाजता ही घटना घडली होती .

करमवीर गुलाबराम जैसवार ( वय 30 , सध्या रा . मानकोली फाटा , दिवागाव , ता . भिवंडी , जि . ठाणे . मूळ रा . बिसनपुर , ता . किराकत , जि . जौनपुर , उत्तर प्रदेश ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे येथे रस्त्याने जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एका ट्रक चालकाने बलात्कार केल्याची घटना 4 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडली होती . आरोपीने कोयत्याचा धाक दाखवून पीडित मुलीचे कपडे देखील फाडले होते . या अमानुष कृत्याबद्दल तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला . आरोपीबाबत काहीही माहिती नसल्याने पोलिसांनी सुरुवातीला आजूबाजूच्या बांधकाम साईटवरील कामगार , परराज्यातून आलेले कामगार आणि सराईत गुन्हेगार यांची माहिती काढली .

मात्र , पोलिसांना काहीही धागा सापडला नाही . त्यानंतर तळेगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा स्मार्ट पद्धतीने तपास केला . गुन्हा घडण्याच्या वेळी किवळे उड्डाणपुलावरून गेलेल्या 30 32 ट्रकची माहिती काढली . पोलिसांनी निवडून काढलेल्या एका ट्रकमध्ये पीडित मुलीकडून आरोपीचे वर्णन घेतल्याप्रमाणे एक ट्रक चालक आढळून आला . पोलिसांनी त्या ट्रकची माहिती काढून ट्रक मालकाला गाठले . त्यावेळी मालकाने सांगितले की , त्या चालकाने ट्रकवरील काम नुकतेच सोडले असून तो दुसऱ्या कंपनीच्या ट्रकवर काम करत आहे . पोलिसांनी दुसऱ्या कंपनीतील ट्रक मालकाशी संपर्क करून आरोपी करमवीर याची माहिती काढली . आरोपी ट्रक घेऊन नागपूरला जात असल्याची माहिती मिळाली . पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आरोपीला ताब्यात घेतले .

करमवीरकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली . त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे , सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील , तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे , पोलीस कर्मचारी अतिश जाधव , सतिश मिसाळ , राम बहिरट , शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली .

Share this: