माझं पिंपरी -चिंचवड

पवना धरण 95 टक्के भरले; नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी (वास्तव संघर्ष) मावळ तालुक्यातील पवना धरण 95 टक्के भरले आहे. त्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरण लवकरच 100 टक्के भरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदी शेजारील आणि पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर मागील दोन दिवसात पुन्हा वाढला आहे. जुलै अखेरपर्यंत दडी मारलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून चांगलीच कृपादृष्टी दाखवली आहे.31 जुलैपर्यंत धरणात 33.60 टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

सध्या पवना धरण 95 टक्के भरले आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर धरण लवकरच 100 टक्के भरणार आहे. धरण भरल्यानंतर लगेच नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.पावसाच्या कमी-अधिक पडण्यावर हा विसर्ग अवलंबून असणार आहे. पावसाने दमदार हजेरी लावली तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जाणार आहे.

नदीचे पाणी वाढले तर नदीकाठच्या गावांना त्याचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.नदीकिनारी असलेली सर्व साधन सामुग्री, वाहने व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावीत. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना देखील प्रशासनाने केली आहे

Share this: