क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचा मृत्यू नव्हे खून ;शेख यांच्या मुलाला देखील जीवे मारण्याची धमकी

पिंपरी (वास्तव संघर्ष) :राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांना कोरोनाची लागण झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या मृत्यूसाठी जावेद शेख यांचे मॅनेजर, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि अन्य एकजण कारणीभूत असून त्यांनी संगनमताने नगरसेवक जावेद शेख यांचा खून केल्याचा आरोप शेख यांच्या पत्नी फैमिदा जावेद शेख यांनी केला आहे.तसेच शेख यांच्या मुलाला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब त्यांनी उघड केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस महासंचालक आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिले आहे.

इखलास सय्यद, डॉ. वाघ, शाहरुक शेख या तिघांनी संगनमत करून नगरसेवक जावेद शेख यांची हत्या केल्याचा आरोप फैमिदा शेख यांनी केला आहे.फैमिदा शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इखलास हे नगरसेवक जावेद शेख यांचे मॅनेजर म्हणून काम पाहत होते.

12 जुलै रोजी सय्यद यांना कोरोनाची लागण झाली. इखलास यांनी शेख यांना आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.नगरसेवक शेख यांना हॉस्पिटलमधील उपचाराचा संशय आल्याने 26 जुलै रोजी त्यांनी तिथे तोडफोड केली. शेख यांनी त्यांच्या मुलाला आणि मॅनेजर इखलास यांना हॉस्पिटलमध्ये उपचार चुकीचे सुरु असल्याचे सांगितले होते.

शेख यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला असता इखलास आणि डॉ. वाघ यांनी शेख यांना दुस-या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी विरोध केला.29 जुलै रोजी दुपारपर्यंत नगरसेवक शेख त्यांच्या घरच्यांसोबत फोनवर बोलत होते. संध्याकाळी शेख यांच्या घरच्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांना रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले.

ज्यावेळी शेख यांचे कुटुंबीय त्यांना दुस-या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची विंनती करत होते, त्यावेळी इखलास आणि डॉ. वाघ यांनी त्यास विरोध केला.अचानक कुटुंबियांना पूर्वकल्पना न देता त्यांना दुसरीकडे दाखल केले, ही बाब संशयास्पद असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.इखलास यांनी शेख यांच्या कार्यालयातून कागदपत्रे गायब केली आहेत. इखलास हे शाहरुक शेख यांना नगरसेवक जावेद शेख यांच्या उत्पन्नातून वेळोवेळी आर्थिक सहाय्य करत होते.जावेद शेख यांच्या मृत्युनंतर त्यांच्या नावावर असलेले दस्तावेज, गाडी आणि अन्य बाबी इखलास आणि शाहरुक या दोघांनी मिळून काढून घेतले.

जावेद शेख यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. फैमिदा शेख यांना कागदपत्रांवर सही करण्यासाठी धमकावले. सही न केल्यास गायब करण्याची धमकी दिली.जावेद शेख यांच्या कमी शिक्षणाचा व राजकीय वलयाचा फायदा घेऊन इखलास आणि शाहरुक यांनी स्वतःच्या नावाने कंपन्या सुरु केल्या. या कंपन्या जावेद शेख यांच्या असल्याचे त्यांनी भासवले.

इखलास आणि शाहरुक या दोघांनी जावेद शेख यांच्या रोख रक्कम आणि सोन्याचा देखील अपहर केला. या सर्व प्रकारांबाबत जावेद शेख यांनी विचारू नये, यासाठी त्यांनी संगनमत करून जावेद शेख यांची हत्या केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी फैमिदा शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे

Share this: