क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

विराज जगताप आणि संतोष अंगरक या तरुणांच्या खूनप्रकरणातील आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करा :पोलिस आयुक्तांना निवेदन

पिंपरी, (वास्तव संघर्ष ) – पिंपळेसौदागर येथील विराज जगताप आणि वाकड येथील संतोष अंगरक या दोन तरुणांच्या खूनप्रकरणातील आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गतील अॅट्रॉसिटी अॅक्टच्या प्रलंबित अर्जावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे मंगळवारी (दि. १५) केली.

पक्षाच्या शिष्टमंडळाने रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, “संपूर्ण महाराष्ट्रला हादरवून सोडणारी घटना आपल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ७ मे २०२० रोजी घडली. यादिवशी पिंपळेसौदागरमधील तरूण विराज जगताप याचे सवर्ण समाजातील मुलीवर प्रेम करतो म्हणून मुलीच्या नातेवाईकांनी मिळून निर्घृण खून केला. या हत्याकांडाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उमटले. या हत्याकांडातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच विराज जगतापच्या कुटूंबियांना तात्काळ कायमस्वरूपी पोलीस सुरक्षा पुरवावी.

त्याचप्रमाणे वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १६ऑगस्ट २०२० रोजी संतोष अंगरक या तरुणाचे अपहरण करून जातीवादातून निर्घृण खून करण्यात आला. या खून प्रकरणातील आरोपींवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टचे शेकडो अर्ज प्रलंबित आहेत. या अर्जावर अद्यापपर्यंत कसलीही कारवाई करण्यात आली नाही. पोलीस ठाण्याच्या स्तरावर अॅट्रॉसिटी अॅक्ट दाखल होण्यासाठी केलेले अर्ज आर्थिक देवाणघेवाण करून स्थानिक पोलीस अर्ज दाबून ठेवतात. त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून अॅट्रॉसिटी अॅक्टच्या प्रलंबित अर्जावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी.”

Share this: