बातम्या

या कारणावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले निलंबित

पिंपरी (वास्तव संघर्ष) कामात बेशिस्त, बेजाबदार, निष्काळजीपणा केल्याबद्दल पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला आता थेट निलंबितच केले.
यामुळे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नुकतीच त्यांची चिंचवड पोलिस ठाणे येथून नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली होती.

चिंचवड पोलीस ठाण्यात असताना त्यांनी एका प्रकरणात सकृतदर्शनी पुरावा नसतानाही गुन्हा दाखल केला. तर, तथ्य नसताना दुसराही गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात १९ तारखेला एका विनयभंगाच्या गुन्ह्यात सकृतदर्शनी पुरावा नसताना देखील गुन्हा दाखल करून त्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच दिवशी सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून सूर्यास्तानंतर एका महिलेला नियमबाह्य अटक केली गेली होती.

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून योग्य पुराव्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यक असते. तसेच पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कार्यवाहीवर लक्ष ठेवणेही ठाणे प्रमुख असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांचे काम आहे. असे असताना जाधव यांनी बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणा करत दोन गुन्हे दाखल केल्याने १७ नोव्हेंबरपासून त्यांना निलंबित करण्यात आले आहे

Share this: