पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि कॉलेज येत्या सोमवारपासून होणार सुरु ;आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा आदेश
पिंपरी (वास्तव संघर्ष) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. त्यानंतर हळूहळू महाराष्ट्र अनलॉक होण्यास सुरूवात झाल्याने सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात निर्बंध शिथील व टाळेबंदी टप्याटप्याने उठविणे ( मिशन बिगिन अगेन ) संदर्भात कोविड – १ ९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सुचना निर्गमीत केलेल्या आहेत . त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग दिनांक २३ नोव्हेंबर २०२० पासुन म्हणजे येत्या सोमवार पासून सुरु करणेबाबत सुधारित आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज शहरातील सर्व शाळांना दिले आहेत.
शाळा सुरु करण्यापुर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य , स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आदेश देखील यामध्ये समावेश आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांचे पालन करण्यात यावे . विद्यार्थांच्या उपस्थिती बाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी .असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून नववी ते १२वीच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना देताना काही मार्गदर्शक नियमावली सांगितली आहे त्याचे पालन करणे देखील बंधनकारक आहे, त्यामध्ये शाळांचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायजरचा वापर, मास्क वापरणे बंधनकारक, केवळ ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती, स्वच्छता राखणे यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टी अवलंब करून आता पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयीन (काॅलेज) वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.