क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक:वंशाला दिवा हवा म्हणून जन्मदात्या आईनेच सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा केला खून

पुणे (वास्तव संघर्ष) – तिसरी मुलगी झाल्यामुळे जन्मदात्या आईनेच सव्वा महिन्याच्या चिमुरडीला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले . ही घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक गावात 25 नोव्हेंबर रोजी घडली.

दिपाली संजय झगडे या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दिपाली झगडे ही दोन महिन्यांपूर्वी माहेरी बाळंतपणासाठी गेली होती . सव्वा महिन्यापूर्वी तिला मुलगी झाली . दीपालीला या आधीही दोन मुली होत्या आणि तिसरीही मुलगीच झाल्याने ती नैराश्यात गेली होती .

25 नोव्हेंबर रोजी सव्वा महिन्याची चिमुरडी पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळली होती . तर ही चिमुकली अचानक गायब झाल्याचा कांगावा दिपाली हिने केला होता . घराच्या जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीत हा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना हा खून घरातल्याच कोणीतरी केल्याचा संशय होता .

चिमुरडीच्या मृत्यूनंतर तिची आई रुग्णालयात अॅडमिट झाल्यामुळे पोलिसांचा दिपालीवरील संशय बळावला . त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता तिने खून केल्याची कबुली दिली . सलग तिसरीही मुलगीच झाल्याने आणि वंशाला दिवा पाहिजे या हट्टापायी तिने हे धक्कादायक कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले . पोलिसांनी तिच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे .

Share this: