भरदिवसा ट्राफिक महिला पोलिसांनी घेतली लाच ;व्हिडिओ क्लिप सोशलमिडीयावर व्हायरल
पिंपरी ( वास्तव संघर्ष ): लाचखोरी प्रकरणी पिंपरी चिंचवड शहरातील काही पोलिस निलंबित होत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेक प्रयत्नांनंतरही पोलीस कर्मचारी लाचखोरी सोडत नसल्याच्या घटना दिसून येतात . अशीच एक व्हिडिओ क्लिप सध्या पिंपरी – चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे . या क्लिपमध्ये भरदिवसा ट्राफिक महिला पोलिस एका तरुणीकडून लाच घेताना दिसत आहे हा प्रकार बुधवार दिनांक 16 डिसेंबरचा असून पिंपरीतील सगुन चौकातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पिंपरी चिंचवड येथील शगुन चौक हा नेहमी गजबजलेला चौक म्हणून शहरात प्रसिद्ध आहे. येथे मोबाईल फोन विक्रेते आणि छोटे मोठे उद्योग सुरू असल्याने या परिसरात मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यासाठी नागरिक येत असतात. त्यामुळे नागरिक नियमबाह्य गाडी चालवताना किंवा नो पार्किंगमध्ये गाडी पार्किंग करत असतील तर वाहतूक पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे . सरकारच्या नियमानुसार पोलिसांना दंडाची रक्कम आता रोख स्वरूपात घेता येत नाही . त्यामुळे एटीएम कार्डद्वारे दंड स्वीकारला जातो . यामुळे लाचखोरीला आळा बसेल , असा सरकारचा भ्रम होता . मात्र लाचखोर नवनवीन युक्त्या शोधत असतात .असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पिंपरीतील शगुन चौकात एक अधिकारी आणि तीन कर्मचारी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी एकत्र आले . त्यामध्ये एका महिला वाहतूक पोलीस कर्मचारी यांचाही समावेश होता . एका दुचाकीवरील दोन महिलांना वाहतूक पोलिसांनी अडविल्याचे त्या क्लिपमध्ये दिसून येत आहे . त्यापैकी एक तरुणी या लाचखोर वाहतूक महिला पोलिसाला गाडी सोडण्याची विनंती करते मात्र त्याक्षणी ती महिला पोलिस त्या तरुणीला काही तरी सांगते आणि पाठमोरी होते महिला पोलीस कर्मचाऱ्याने सूचना दिल्याप्रमाणे ही तरुणी महिला पोलिसाच्या मागच्या खिशात पैसे ठेवताना त्या क्लिपमध्ये दिसून येते .
दरम्यान, हि व्हिडिओ क्लिप सोशलमिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून या लाचखोर वाहतूक महिला पोलिसावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.