पिंपरीतील मोरवाडीत राहणाऱ्या एका महिलेची लाखोंची फसवणूक
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील मोरवाडी राहणाऱ्या एका महिलेची केवायसी अपडेट करण्याच्या तसेच इंटरनेट बँकिंगच्या बहाण्याने एका अज्ञात इसमांनी एक लाख 57 हजार 699 रुपयांची फसवणूक केली . ही घटना 17 मे आणि 13 जून रोजी मोरवाडी , पिंपरी येथे घडली .
याप्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी ( दि . 19 ) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांना अज्ञात इसमाने 8597861251 आणि 9775596198 या क्रमांकावरून केवायसी अपडेट करण्याबाबत मेसेज केला . केवायसी अपडेट न केल्यास तुमचे अकाउंट रद्द करण्यात येईल असेही मेसेजमध्ये सांगण्यात आले . तसेच आरोपींनी फिर्यादी यांना मेसेज द्वारे लिंक पाठवली . 13 जून रोजी 9593552544 या क्रमांकावरून अज्ञात इसमाने फिर्यादी यांना फोन केला . फोनवरील व्यक्तीने ‘ मी एसबीआय बँकेतून बोलत आहे .
आपल्याला इंटरनेट बँकिंग करत असताना ओटीपी सेंड होत नाही , असे आम्हाला समजले आहे . तुम्हाला केवायसी बाबत आलेल्या मेसेज मधील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या तक्रारीचे निवारण करू शकता ‘ , असे सांगितले . त्यानुसार फिर्यादी महिलेने त्यांना आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केली . त्यानंतर फिर्यादी यांच्या एसबीआय बँकेचे चाकण शाखा येथील खात्यामधून एक लाख 57 हजार 699 रुपये अज्ञातांनी ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले . याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.