क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

ठेकेदारांकडून लाच घेतल्याप्रकरणी नितीन लांडगेना न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते . त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितली . याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी ) सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष , त्यांचे स्वीय सहाय्यक , लिपिक , संगणक चालक आणि शिपाई अशा पाच जणांना अटक केली . ही कारवाई बुधवारी ( दि . 18 ) पिंपरी चिंचवड महापालिकेत करण्यात आली . या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . स्थायी समिती अध्यक्ष अॅड . नितीन ज्ञानेश्वर लांडगे , स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे , लिपिक विजय शंभुलाल चावरिया , शिपाई अरविंद भीमराव कांबळे , संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी हे जाहिरातीचा व्यवसाय करतात . पिंपरी – चिंचवड महापालीकेच्या जागेमध्ये होर्डिंग उभारण्याकरीता त्यांनी भरलेल्या 28 निविदा मंजूर झालेल्या आहेत . परंतु , त्यांची वर्कऑर्डर अद्याप न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती अॅड . नितीन ज्ञानेश्वर लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले असता वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या 28 निविदांच्या बोली रक्कमेच्या ( बीड अमाऊंट ) 3 टक्के रक्कम 10 लाख रूपये लाचेची मागणी केली .

तडजोडीअंती 2 टक्के प्रमाणे सहा लाख रुपये घेण्याचे मान्य केले . 6 लाख रूपयांची मागणी करून त्यापैकी तयार असलेल्या 6 करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्यासाठी 2 टक्क्याप्रमाणे 1 लाख 18 हजार लाच रक्कमेची मागणी करून ती तेथील लिपिक विजय चावरिया , संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्वीकारली . एसीबीच्या पथकाने सापळा लावून कारवाई केली . पाचही जणांना पोलिसांनी अटक केली . सर्व आरोपींना गुरुवारी ( दि . 19 ) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली .

Share this: