आयुक्त कार्यालयाला खानावळ करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुरूवारी आयुक्त कार्यालयात जेवणावळ
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते व घरगडी असल्यासारखे वागत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील बैठकीसाठी आले असताना त्यांच्या भोजनव्यवस्थेसाठी महानगरपालिका आणि आयुक्तांच्या दालनाचे खानावळीत रुपांतर करण्यात आले होते .
आयुक्तांनी भाजप या एकमेव पक्षाच्या मंत्र्यांसाठी पायघड्या घातल्या हा प्रकार शहराच्या दृष्टीने निदंनीय असून खानावळीसाठी भाजप नेते, मंत्री, पदाधिका-यांना जेवणासाठी आयुक्तांनी स्वत:च्या घरी घेऊन जावे किंवा त्यांच्यासाठी खानावळ सुरू करावी, असा घनाघात माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांनी केला होता.
त्यानंतर पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयाचे आयुक्त खानावळ असे नाव देत खानावळ सुरू करावी अशी मागणी केली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने नगरसदस्यांसाठी गुरुवार दिनांक ५/९/२०१९ रोजी दु. १.०० भोजनाचा कार्यक्रम आयुक्त दालनात घेण्यात येणार आहे. भोजनास परवानगी मिळणेची मागणीचे पञ आयुक्तांना दिले आहे .