वडिलांसाठीच तुझ्याशी लग्न केले, त्यांच्या इच्छेप्रमाणे वाग पत्नीला पतीचा अजब सल्ला
पिंपरी(वास्तव संघर्ष) सासरा लगट करीत असल्याची तक्रार पत्नीने पतीकडे केली. त्यावेळी वडिलांसाठीच तुझ्याशी लग्न केले असून त्यांच्या इच्छेप्रमाणे वाग, असा अजब सल्ला पतीने दिला. या प्रकरणी पती आणि सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत 36 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 2) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी 40 वर्षीय पती आणि 65 वर्षीय सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे 2018 ते 16 सप्टेंबर 2018 या कालावधीत ही घटना चिखलीतील सानेवाडी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सासरी नांदत असताना आरोपींनी आपसांत संगनमत करून माहेराहून पैसे आणावेत या कारणासाठी शाररिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच फिर्यादी यांचे पती कामावर गेल्यानंतर घरात असलेले सासरे कशाचा तरी बहाणा करून फिर्यादी यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असे.
ही बाब फिर्यादी यांनी आपल्या पतीला सांगितली असता “तुझ्याशी लग्न हे माझ्यासाठी केलेले नसून वडिलांसाठी केले आहे. तू त्यांच्या इच्छेप्रमाणे राहत जा, असे सांगून त्या दोघांनीही आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्याशी भांडण केले. तसेच त्यांना माहेरी पाठवून घटस्फोटाची मागणी करणारी नोटीस पाठविली. महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत याबाबत अधिक तपास करीत आहेत.