पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने सायकल फेरीचे आयोजन
पिंपरी(वास्तव संघर्ष) :– पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २० डिसेंबर रोजी सायकल फेरी (सायक्लोथॉन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल फेरी (सायक्लोथॉन) सांगवी फाटा ते साई चौक (जगताप डेअरी) ते सांगवी फाटा या बीआरटीएस मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या फेरीचा प्रारंभ होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणा-या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, संग्राम थोपटे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, ३३० इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडीअर आर. सी. कटोच, लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन अभय शास्त्री यांच्यासह पदाधिकारी, नगरसदस्य, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित राहणार आहेत.
स्वच्छ भारत – स्वस्थ भारत या अभियानाअंतर्गत इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज या केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये हवा-ध्वनी प्रदुषण टाळून, इंधन बचती बरोबरच उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चालविण्याची गरज तसेच महत्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजात विशेषतः आजच्या तरूण पिढीमध्ये कोवीड साथीच्या काळात व्यायामाचे महत्व त्याच बरोबर इंधन बचतीचा संदेश रूजवण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांचा आंतरराष्ट्रीय ट्रायथॅलॉन स्पर्धा पुर्ण केल्याबाबत सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच वेणुगोपाल राव, जय पाठक, श्रीपाद शिरोडे आणि अरूण पोटे यांचाही सत्कार करण्यात येईल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिका आयुक्त, बीआरटीएस विभाग, इतर विभागाचे सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच लायन्स क्लब प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमामध्ये पिंपरी चिंचवड व पुणे परिसरातील सायकल क्लब देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवून उर्जा बचत आणि हवा-ध्वनी प्रदुषण टाळून, इंधन बचतीचा संदेश समाजात रूजवावा असे आवाहन महापौर ढोरे यांनी शहरवासीयांना केले आहे