भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचा बनावट जातीचा दाखला बनवणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
सोलापूर(वास्तव संघर्ष) : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सोलापूरचे भारतीय जनता पार्टीचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात याआधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . भाजप खासदार महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जातप्रमाणपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे . याप्रकरणी आता महास्वामी यांचे बनावट जातीचे प्रमाणपत्र बनवणा-याला सोलापूर गुन्हे पोलिसांनी अटक केली आहे.
शिवसिद्ध बुळा असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता. यानंतर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी जातीचा बनावट दाखल तयार केला होता. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढताना वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. शिवसिद्ध बुळा या व्यक्तीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा बनावट दाखला तयार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे
काय आहे प्रकरण?
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे भारतीय जनता पार्टी कडून विजयी झाले आहेत . खासदार महास्वामी यांनी बेडा जंगम ही या जातीचे बनावट प्रमाणपत्र शिवसिद्ध बुळा या व्यक्तीकडून तयार करून घेतले आहे. माञ बेडा जंगम ही जात लिंगायत पंथ समूहातील नसून वेगळी असल्याचे निरीक्षण जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात नोंदविण्यात आले . त्यामुळे डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे सदस्यत्व रद्द होवून लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होवू शकते .
दरम्यान, जात प्रमाणपत्राबद्दल प्रमोद गायकवाड , मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी तक्रार केली असून या तक्रारीनुसार जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे.