पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त म्हणून राजेश पाटील यांनी पदभार स्वीकारला
पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकपदी करण्यात आली.त्यानंतर आज सोमवारी (दि. 15) रोजी दुपारी 12 च्या दरम्यान पालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार राजेश पाटील यांनी स्वीकारला आहे.हर्डिकर यांची 12 फेब्रुवारी २०२१ रोजी बदली करण्यात आली होती. दरम्यान, आता महापालिकेची धुरा राजेश पाटील सांभाळणार आहेत.
राजेश पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील असल्याचे बोलले जात आहे. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त असलेले श्रावण हर्डीकर यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्तपदी नियुक्ती केली होती.
आयुक्त राजेश पाटील यांचा परिचय :-
राजेश प्रभाकर पाटील (IAS) यांची जीवनकथा ही लक्षावधी तरूणांसाठी प्रेरणादायी बनली आहे ते मूळचे एरंडोल तालुक्यातील रहिवासी आहेत. युवकांचे आयकॉन तथा सध्या ओडिशा राज्यातील आयएएस कॅडरचे अधिकारी राजेश पाटील यांची प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात बदली करण्यात आली असून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पदभार सांभाळणार आहेत. त्यांचे पालक हे शेतमजूर होते. तर शिकत असतांना राजेश पाटलांना पाव व भाजी विक्रीचे काम करावे लागले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यानंतर त्यांनी जिद्दीने पुढील शिक्षण पूर्ण केले. २००५ सालच्या युपीएससी परिक्षेत त्यांनी यश संपादन करून भारतीय प्रशासनीक सेवा अर्थात आयएएसमध्ये प्रवेश केला.
स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. राजेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे राजेश पाटील यांचे आत्मचरित्रपर पुस्तक खूप लोकप्रिय आहे.