बातम्यामहाराष्ट्र

दलितांवरील हल्ले थांबविण्यासाठी त्वरित उपाययोजना करा ; रामदास आठवले

नांदेड (वास्तव संघर्ष) – राज्यात दलितांवरील हल्ले वाढत आहेत.दलितांवरील हल्ले थांबविण्यात राज्य सरकार ला अपयश आले आहे.दलितांवरील हल्ले थांबविण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवनी जामगा या गावात संदीप दुधमल या बौद्ध कुटुंबावर सवर्ण समजातील काही लोकांनी सामूहिक हल्ला केला.त्यात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बौद्ध समाजाच्या युवक गणेश एडके यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून जबर जखमी करण्यात आल्याची घटना घडली. त्या गावात आज ना. रामदास आठवले यांनी भेट देऊन पीडित बौद्ध कुटुंबाची भेट घेतली. त्यांना न्याय मिळवून देण्याची हिम्मत दिली.

या हल्ल्यात गंभीर जखमी असणारे एडके हे औरंगाबाद मधील के आर एल हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. के आर एल हॉस्पिटल च्या डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जखमी एडके यांच्या प्रकृतीची ना.रामदास आठवले यांनी चौकशी केली. जखमी गणेश एडके यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी ऍट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी योग्य कलम दाखल करून सर्व आरोपींना त्वरित अटक केली आहे.याप्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही.आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल अशी माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी ना रामदास आठवले यांना दिली.
या प्रकरणी सामाजिक न्याय विभागातर्फे पीडित दलित कुटुंबाला 4 लाखांची मदत जाहीर झाली असून त्या पैकी 1लाख रुपयांचा चेक आज देण्यात आला.

जातीभेद मिटले पाहिजेत.दलित सवर्ण एकजूट व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत.दलित सवर्ण गावात एकजुटीने राहावेत हा आमचा प्रयत्न असला तरी जातिभेदातून जातीय द्वेषातून दलितांवर सामूहिक हल्ले होण्याचे प्रकार राज्यात होत आहेत.दलितांवरील वाढते हल्ले मुख्यमंत्र्यांनी थांबवावेत असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. यावेळी ना रामदास आठवले यांच्या समवेत रिपाइं चे राज्य उपाध्यक्ष विजय सोनवणे; मिलिंद शिरढोणकर; शिवाजी सोनवणे आदी रिपाइं चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Share this: