धक्कादायक :चिखलीतील घरकुलमध्ये अनधिकृतपणे 42 सदनिकांचा ताबा घेतल्याप्रकरणी भाजपचे भिमा बोबडे यांच्यावर गुन्हा दाखल
चिखली (वास्तव संघर्ष) : पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी चिखली येथे घरकुल प्रकल्पाची निर्मिती करत आहे . इमारतीच्या पुर्णत्वानंतर टप्प्याटप्प्याने त्याचे लाभाथ्यांना हस्तांतरण केले जात आहे . सुमारे सात हजार घरांच्या या प्रकल्पात पालिकेकडून वाटप न झालेल्या डी -12 या इमारतीचे बांधकाम सुरु असताना यातील 42 सदनिकांचा ताबा नागरिकांनी घेतला आहे . महापालिका अधिकाऱ्यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता या प्रकल्पात घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे या सदनिकांचा ताबा घेतल्या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकासह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली येथे शनिवारी (दि. 25) दुपारी घडली
गजानन मारुती गावडे ( वय-37 , रा . धायरी , पुणे ) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
भाजपच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी बोबडे यांचे पती भिमा बोबडे , युवराज सुर्यभान कोकाटे ( रा.नेवाळेवस्ती ) , अशोक रामभाऊ धोंडे , धन्यकुमार अंकुशराव पुजारी , मंगला अरुण कोंढारे , निवृत्ती कृष्णा पवार , अर्चना संजय कांबळे , भगवान लिंबाजी लांडगे , सुशीला शशिकांत मावरकर , विजय बळीराम गायकवाड , भगवान दगडु कांबळे , वसंत लक्ष्मण गुरव , सुर्यकांत मल्लाप्पा बनसोडे , शिवाजी हनुमंत जाधव , नवनाथ रामचंद्र फडतरे , विजय नारायण जोगदंड , बालाजी गोरोबा शिखरे , बालाजी विश्वनाथ गायकवाड , अशोक सखाराम चव्हाण , भिकु महादेव कोहाडे , देवानंद सदाशिव खांबे , सुरेंद्र त्रिंबकराव ढोणे , रवींद्र माणिकराव बोरकर , राम व्यंकटी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावडे हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांनी घरकुलाच्या इमारतीचे बांधकाम केले आहे. मात्र या घराचे महापालिकेकडून अधिकृत वाटप झालेले नाही. आरोपींनी आपसांत संगनमत करून डी-12 येथील इमारतीचा बेकायदेशीरपणे ताबा घेऊन 42 सदनिकांचा ताबा घेतला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक तौफीक सय्यद अधिक तपास करत आहेत .