महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्यासाठी पिंपरीत आंदोलन
पिपंरी (वास्तव संघर्ष ): मागील सात वर्षांपासून केंद्रात भाजपाची सत्ता आहे. देशभरातील जनतेला फसवी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशातील लोकशाहीचा गळा घोटणारे हुकूमशाही निर्णय घेतले. अशा हुकूमशाही सरकारच्या धोरणामुळे देशातील सर्व थरातील सर्व समाज घटक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. सोमवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन पिंपरीतील आंदोलनात उपस्थित राहून केंद्र सरकार विरुध्द तीव्र निषेध नोंदवावा असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
लखीमपूर येथे शेतकरी आंदोलकांवर भाजपाच्या मंत्री पुत्राने धावते वाहन घातले. यात पाच शेतक-यांचा दुर्दैवी अंत झाला. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंद मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी पिंपरी मध्ये शनिवारी सर्वपक्षिय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाघेरे बोलत होते. या पत्रकार परिषदेस कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच ज्येष्ठ नेते अशोक मोरे, विजय लोखंडे, ॲड. गोरक्ष लोखंडे, फझल शेख, पांडुरंग पाटील, अनिल रोहम, उमेश खंदारे, राजेश वाबळे, डॉ. वसिम इनामदार, भाविक देशमुख, तुषार नवले, रामचंद्र बांगर आदी उपस्थित होते.
यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. मागील सात वर्षात केंद्र सरकारने कामगार आणि शेतकरी विरोधी निर्णय घेतले. प्रचलीत शेतकरी आणि कामगार कायदे रद्द करुन भांडवलदारांना पुरक ठरणारे नविन कायदे केले. यावेळी त्यांनी देशाच्या लोकशाहीचे प्रवित्र मंदिर असणा-या संसदेमध्ये विरोधी पक्षांना साधी चर्चा करण्याचीही संधी मोदी – शहा यांच्या हुकूमशाही सरकारने दिली नाही. कोणाचीही मागणी नसतानाही हे काळे कायदे आणले. या विरुध्द आवाज उठवण्यासाठी आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत म्हणून दिल्लीच्या सीमारेषांवर हजारो शेतकरी मागील 310 दिवसांपासून ऊन, पावासाची तमा न बाळगता आंदोलन करीत आहेत. यापुर्वी या आंदोलनात शेकडो शेतकरी मृत्यू पावले आहेत. या शेतक-यांशी चर्चा करण्याऐवजी शेतकरी कायद्यांप्रमाणेच कामगार कायदे देखिल मागणी नसतानाही कौट्यावधी जनतेवर लादून देशाच्या पुढच्या पिढ्या गुलामगिरीत ढकलण्याचे धोरण मोदी – शहांचे आहे. कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेतलेल्या या केंद्र सरकारला जाग यावी, यासाठी सोमवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये राज्यातील जनतेने सहभागी व्हावे. तसेच पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सर्व औद्योगिक कारखाने या दिवशी बंद ठेवावेत असेही आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि शहर कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या सोमवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये शहरातील सर्व शिवसैनिक सहभागी होतील. सर्व नागरिकांनीही सोमवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी करुन केंद्र सरकारचा निषेध करावा असे आवाहन शिवसेना शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी केले.