बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दिव्यांग बांधवांच्या पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांचा पुन्हा सर्वे करा ;महापौर माई ढोरे यांच्याकडे निवेदन

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने 2017 सालापासून पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग बांधवांसाठी पंडित दीनदयाल पेन्शन योजना राबविली आहे. यामुळे शहरातील दिव्यांग बांधव हे दुस-यांवर अवलंबून न राहता स्वावलंबी जीवन जगत आहेत. माञ याचाच गैरफायदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील काही जण घेताना दिसत आहेत यामुळे स्थानिक दिव्यांग बांधवांवर अन्याय होत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांची पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांचे पुन्हा सर्वे करण्याची मागणी झुंज दिव्यांग संस्थेचे राजू हिरवे यांनी महापौर माई ढोरे आणि दिव्यांग सहाय्यक उपआयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हिरवे यांनी निवेदनात म्हटले आहे की, झुंज दिव्यांग संस्थेच्या असे निदर्शनास आले आहे की, पंडित दीनदयाल पेन्शन योजनेचा लाभ पिंपरी- चिंचवड हद्दीत राहत असलेल्या दिव्यांग बांधवांना मिळत नसून पिंपरी – चिंचवडच्या बाहेरील रहिवासी दिव्यांग सुद्धा घेत आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पिंपरी -चिंचवड हद्दीत राहणाऱ्या दिव्यांगांच्या योजना राबविण्यासाठी जो निधी येतो, त्यात घट पडत आहे. यासाठी आमची अशी मागणी आहे की, पंडित दीनदयाल पेन्शन योजना या योजनेच्या पात्र लाभार्थी यादीचे पुनः सर्वे व्हावे.जेणेकरून आपल्या पिंपरी -चिंचवड हद्दीतील दिव्यांगा साठी जास्तीत -जास्त योजना राबवता येतील.

या योजनेच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी म्हणून मतदान कार्ड,आधार कार्ड ,अपंगाचा दाखला, तसेच पात्र दिव्यांग व्यक्ती जर भाडे तत्वावर राहत असेल तर त्या लाभार्थीचा भाडेकरारनामा हा तीन वर्षांपूर्वीचा (बॉण्ड पेपर ) असावा. असे दिव्यांग बांधवांचे कागदपत्र गृहीत धरावे. व त्यांना पेन्शनचा लाभ द्यावा.स्थानिक पिंपरी-चिंचवडचे नसतानाही जे लाभार्थी आपल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पंडित दीनदयाल दिव्यांग पेन्शनचा लाभ घेत आहेत. अशा लोकांवर आपल्या महानगरपालिकेने लवकरात लवकर कठोर कारवाई करावी .असे देखील या निवेदनात म्हटले आहे.

Share this: