शिष्यवृत्तीपासून शहरातील एकही विद्यार्थी वंचित राहू देऊ नका, उपमहापौरांची प्रशासनाला सूचना
पिंपरी(वास्तव संघर्ष) : बारावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या बक्षीस योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्रमाणपत्र आणण्यात अडचणी येत आहेत. शहरातील एकही विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये. त्यासाठी जास्तीत -जास्त विद्यार्थ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांशी संबंधित बक्षीस योजनेचे अर्ज करण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील इतर कल्याणकारी योजने अंतर्गंत 12 वी मध्ये 80 ट्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या तसेच उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक व कामगार नगरी असून ब-याच गोरगरीब कष्टकरी, कामगार व खाजगी नोकरदार इत्यादींचे पाल्य सदर बक्षीस योजनेस पात्र असूनदेखील त्यांना महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात अर्ज वेळेत दाखल करणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, महाविदयालयात प्रवेश घेतल्याबाबत फी भरलेली पावती, बोनाफाईड प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे किंवा पालकाचे राष्ट्रीयकृत बॅकेतील खाते व पास बुकची झेरॉक्स, प्रवेश घेतलेल्या संस्थेतील मुख्याध्यापक / प्राचार्य यांची शिफारस व इतर संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात. तथापि सदर योजनेकरिता अर्ज भरणेची मुदत ऑक्टोबर अखेर संपुष्टात येत असून ब-याच विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळविण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे अर्ज विहित मुदतीत सादर करणेकामी अडचण निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.
शिष्यवृत्तीसाठी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्यांचा सही शिक्का पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत. तर, हे विद्यार्थी कोणाचे सही, शिक्का आणणार, त्यामुळे विद्यार्थी बक्षीस योजनेपासून वंचित राहतील. शहरातील एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहता कामा नये. बक्षीस योजनेचा गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठा हातभार लागणार असून बक्षीस योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. तसेच शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांशी संबंधित बक्षीस योजनेचे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर पुढील एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी सूचना उपमहापौर घुले यांनी केली