बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील सर्व टपरी आणि फेरीवाल्यांचे लवकरच होणार सर्वेक्षण

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करीत असून पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी शहरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याकामी फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

पंचवार्षिक सर्वेक्षण 2021 – 22 च्या पूर्व तयारीबाबत आज शहर फेरीवाला समितीची बैठक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले, महापालिका क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, विजय थोरात, रविकिरण घोडके, भूमी आणि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, टपरी पथारी हातगाडी पंचायतीचे प्रल्हाद कांबळे, अनिता सावळे, रमेश शिंदे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे रफिक शेख, जाणीव संघटनेचे संजय शंके तसेच पथारीवाला संघटनांचे प्रतिनिधी प्रविण कांबळे, अॅड. बी. के. कांबळे, दामोदर मांजरे, मनिषा राऊत, ज्ञानेश्वर मोरे, सरोज अंबिके, डॉ. शिवदास पाटील आदी उपस्थित होते.

हॉकर्स व्यवस्थापन प्रणालीचे संगणकीय सादरीकरण आणि धोरणाबाबतची प्राथमिक माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली. यानंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना बैठकीत मांडल्या. यामध्ये अतिक्रमण कारवाई करताना फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांना सौजन्याची वागणूक द्यावी, यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणातील पथारीवाल्यांना प्राधान्य असावे, फेरीवाल्यांचे योग्य जागी पुनर्वसन करुन त्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र द्यावे, फेरीवाल्यांकडील माल जप्तीची कारवाई करु नये, सर्वेसोबत जागा निश्चिती करावी आदी सुचनांचा समावेश होता.

संघटना प्रतिनिधींनी केलेल्या योग्य सूचनांचा अंतर्भाव फेरीवाला धोरणामध्ये केला जाईल असे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, शासनाच्या अधिनियमाप्रमाणे महापालिका फेरीवाल्यांचे व्यवस्थापन करीत आहे.

Share this: