आयुक्त राजेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दिली सुपारी ;सत्ताधारी भाजपचा गंभीर आरोप
पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील हे राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सुपारी दिल्याचा गंभीर आरोप महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पत्रकार परिषदेत केला.आज बुधवारी (दि.15) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेला उपमहापौर हिराबाई घुले, नगरसेवक सागर आंगोलकर हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर माई ढोरे म्हणाल्या की, कोरोना काळात गोरगरीब पिंपरी-चिंचवडकरांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा विषय मंजुर करण्यात आला होता. या विषयाला आयुक्त राजेश पाटील यांनी केराची टोपली दाखवली. तसेच
कोरोना काळात पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 3000 टॅब खरेदीचा आमचा आग्रह आहे, पण तो विषयसुध्दा आयुक्तांनी थांबवला. आता महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या कामातही तोच कित्ता ते गिरवला जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना केलेल्या अक्षम्य चुकांमुळे राज्य निवडणूक आयोगाने त्यांना फटकारल्याचे ताजे उदाहरण आहे. आयुक्त राजेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावाखाली काम करत आहेत हे उघड आहे.
जनहिताच्या कामांना आडकाठी आणून सत्ताधारी भाजपला बदनाम करण्याचे षड्यंत्र ते रचत असून आयुक्त राजेश पाटील या शहराचे मालक असल्याच्या अविर्भावात वागत आहेत. अनेक वार्डातील कामेसुध्दा आयुक्तांनी थांबवली आहेत. कुठल्याही कामाचे टेंडर काढू देत नाहीत. आयुक्त हे आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. अशा शब्दांत महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.जर आयुक्त असेच वागत राहिले तर आम्हांला आयुक्तांविरोधात आंदोलन करावे लागेल असा इशाराही यावेळी महापौरांनी पत्रकारांशी बोलताना दिला.