बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

महापालिका निवडणुका तीन महिने पुढे जाउद्या ;प्रशासक म्हणून आयुक्त राहतील : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे (वास्तव संघर्ष) : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार याबाबत नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये मोठी चर्चा आहे मात्र या चर्चेवर खुद्द उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ओबीसींबाबत सध्या निर्णय होणे गरजेचे आहे. राज्य सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहेच. मात्र निकाल लागला नसल्यानेच निवडणुका लांबणीवर पडत आहेत.निवडणुका लांबल्या म्हणून आभाळ कोसळत नाही. मुदत संपल्यानंतर महापालिका स्तरावर आयुक्त हेच प्रशासक राहतील . मात्र ;ओबीसी बांधवांवर अन्याय होता कामा नये ही राज्य सरकारची भूमिका आहे. पूर्वी 12 ते 13 वर्षे निवडणुका लांबल्या होत्या अशी आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दिली.

त्यानंतर बदल होऊन प्रत्येक 5 वर्षानंतर निवडणुका होऊ लागल्या.  त्यामुळे 2 ते 3 महिने निवडणुका लांबल्या तर महापालिका स्तरावर आयुक्त, जिल्हा परिषद व नगरपरिषद स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. राज्यात सत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार असताना देखील ही पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमकपणे उतरत नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना पवार म्हणाले की, काही गोष्टी दाखवायच्या नसतात. नाराज कार्यकर्त्यांना कसे खुष करायंच हे मला चांगले माहित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी निवडणुका लढवत आणि पाहत आहे. पक्षाच्या रणनीती जाहीरपणे न सांगता आम्ही त्या योग्य वेळी योग्य त्या ठरवू असे प्रतिपादन अजित पवार यांनी यावेळी केले.

Share this: