बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

देशाची एकता आणि एकात्मता संविधानामुळे अधिक मजबुत झाली आहे : महापौर माई ढोरे

पिंपरी (वास्तव संघर्ष) : भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या स्वच्छ शहर स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला प्रथम स्थान मिळवून देण्याचा महापालिकेने संकल्प केला असून शहरवासियांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन शहराला स्मार्ट स्वच्छ शहर बनवावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानंतर महापौर माई ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना  शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास आयुक्त राजेश पाटील,  सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे,  प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, शैलेंद्र मोरे, माजी महापौर योगेश बहल , अपर्णा डोके, नगरसदस्या मिनल यादव, शर्मिला बाबर , सुजाता पालांडे, माजी नगरसेवक गोविंद पानसरे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, विकास ढाकणे, उल्हास जगताप , कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, स्विकृत सदस्य सुनिल कदम, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

भारतीय नागरिकांमध्ये आपल्या संविधानाबद्दल नितांत आदर आहे. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातुन साकारलेल्या संविधानामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावुन घेण्यात आले आहे. देशाची एकता आणि एकात्मता संविधानामुळे अधिक मजबुत झाली आहे, असे नमूद करून महापौर माई ढोरे म्हणाल्या, देशाचा विकास हा शहराच्या विकासावर अवलंबून असतो. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी योगदान देणा-या प्रत्येकाचा त्याग महत्वपूर्ण आहे. कामगार, कष्टकरी आणि इथल्या उद्योगधंद्यांनी या नगरीला वैभवशाली बनविले. शहरातील कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलीस, सैनिक, डॉक्टर, अभियंते, संशोधक, शास्त्रज्ञ, खेळाडू, कलावंत, साहित्यिक अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजची पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी घडली आहे. या शहराला स्मार्ट सिटी बनवणा-या सर्वांप्रती महापौर ढोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Share this: