गजानन चिंचवडे आत्महत्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चिंचवड(वास्तव संघर्ष) : चिंचवडगाव मधील भाजपाचे नेते गजानन चिंचवडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गजानन चिंचवडे यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे (वय-45) यांनी शनिवारी (दि.5) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शकुंतला बाळू चिंचवडे, दिनेश बाळू चिंचवडे, राजेश बाळू चिंचवडे, महेश उर्फ सुनील बाळू चिंचवडे, ओंकार महेश चिंचवडे, संकेत दिनेश चिंचवडे, तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे चिंचवडगाव मधील नेते गजानन चिंचवडे यांचा शनिवारी (दि. 5) दुपारी एक वाजताच्या पूर्वी मृत्यू झाला. आरोपींनी गजानन चिंचवडे यांच्या विरोधात 25 जानेवारी रोजी फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल केला. त्याची न्यूज पेपर, न्यूज चॅनलला बातमी देऊन चिंचवडे यांची बदनामी करत त्यांना मानसिक त्रास दिला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 306, 34नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोरडे तपास करीत आहेत.