आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

खाजगी किंवा शासकीय जागेवर राडारोडा टाकल्यास होणार कडक कारवाई-आयुक्त राजेश पाटील

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम करताना व जुने बांधकाम पाडताना किंवा शासकीय संस्थाची विकासकामे करताना निर्माण होणारा बांधकाम राडारोडा टाकण्यासाठी सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रशासकीय क्षेत्रात ठिकाणे निश्चित करून देण्यात आली आहेत, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.

अ प्रभागात निगडी पोलीस स्टेशन जवळ ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. ब प्रभागात मस्के वस्ती रावेत, क प्रभागात कचरा संकलन केंद्र गवळीमाथा, ड प्रभागात व्हिजन मॉलजवळ हायवे वाकड, इ प्रभागात च-होली स्मशान भूमी जवळ, फ प्रभागात अंकुश चौक स्पाईन रोड यमुनानगर येथे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. ग प्रभागात थेरगाव स्मशानभूमी जवळ तर ह प्रभागात दापोडी रेल्वे स्टेशन जवळ ठिकाण निश्चित केले आहे. या ठिकाणी राडारोडा संकलित केला जाणार आहे. बांधकाम राडारोडयामध्ये कॉंक्रीट, माती, स्टील, लाकुड, विटा आण‍ि रेतीमधील सिमेंट या बांधकाम साहित्याशिवाय इतर कचरा मिसळू नये.

राडारोडा टाकण्यासाठी प्राथमिक स्तरावर आठही प्रभागात ठिकाणे निश्चित करण्यात आली असून आवश्यकतेप्रमाणे यात वाढ करण्यात येणार आहे. या राडारोडयावर मोशी येथील प्लँटवर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने स्वतंत्र एजन्सीची नेमणूक देखील केली आहे, अशी माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.

निश्चित केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त अनध‍िकृतपणे कोणीही नैसर्गिक नदी, नाले, ओढे, तळे इत्यादी जलस्त्रोताच्या बाजुने किंवा रस्ता, पदपथ किंवा मोकळया खाजगी, शासकीय जागेवर राडारोडा टाकल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी दिला आहे.

Share this: