बातम्या

पिंपरी चिंचवड पालिकेचा 6 हजार 497 कोटींचा अर्थसंकल्प सादर

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहराची ओळख स्पोर्टस् हब अशी करण्याच्या दृष्टीने शहरामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच झोपडपट्टी भागांमध्ये राहणा-या नागरिकांकरिता तातडीने प्रथमोपचार करण्यासाठी जागोजागी जिजाऊ क्लिनिक सुरु करणे, शहराला सायकल फ्रेंडली सिटी बनविणे, सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, स्वच्छाग्रह अभियानाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराला देशातील प्रथम क्रमांचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविणे आणि शहरातील सर्व भागांमध्ये समाजातील सर्व घटकांना मिळतील अशा प्रकारच्या शैक्षणिक, आरोग्य, वैद्यकीय आणि क्रीडा विषयक अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अशी वैशिष्ट्ये असलेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन 2022 – 23 चा सुमारे 6 हजार 497 कोटी 2 लाख रूपयांचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये सादर करण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन 2021-22 चे सुधारीत व सन 2022 – 23 चे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसह सुमारे 6 हजार 497 कोटी 2 लाख रूपयांचे अंदाजपत्रक अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे यांच्याकडे सादर केले.

     सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात आरंभीच्या शिल्लकेसह 4 हजार 961 कोटी 65 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यामध्ये मार्च 2023 अखेर 5 कोटी 2 लाख रुपये शिल्लक राहून प्रत्यक्ष खर्च 4 हजार 956 कोटी 63 लाख रुपये अपेक्षित आहे.

 महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या विविध विकासकामांसाठी 1 हजार 618 कोटी 68 लाख रुपये इतक्या भरीव रकमेची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांसाठी अनुक्रमे 28 कोटी 23 लाख, 8कोटी 94 लाख, 19 कोटी 31 लाख, 7कोटी 38लाख, 6कोटी 71 लाख, 12 कोटी 91 लाख, 8 कोटी 20 लाख, 23 कोटी 46 लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

शहरी गरिबांकरिता 1 हजार 457 कोटी 11 लाख रुपये, पाणीपुरवठा विशेषनिधीकरिता केलेली  200 कोटी रुपये, महिलांसाठी॑च्या विविध योजनांसाठी 45 कोटी रुपये, स्मार्ट सिटीकरिता 50 कोटी रुपये, मेट्रो प्रकल्पासाठी 25 कोटी रुपये,  स्वच्छ भारत मिशनसाठी 10 कोटी रुपये, दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 44 कोटी रुपये, विविध नाविन्यपूर्ण विशेष योजनांसाठी 938 कोटी 38 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.

2022 – 23  या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने महत्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये पे ॲड पार्क योजनेतून शहरात होणारी वाहतुकीची कोंडी दूर करणे, तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छालये उभारून त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, पिंपरी येथे दिव्यांगांस साठी कल्याणकारी केंद्र बांधणे, महिला बचत गटांसाठी संरचनात्मक ढाचा तयार करणे, शहरामध्ये वैद्यकीय सुविधांसह अत्याधुनिक डॉग पार्क विकसित करणे, महानगरपालिकेच्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करणे, सर्व प्रभागांत आणि विभागीय कार्यालयांमध्ये मल्टी नोडल पार्किंग स्लॉट विकसित करणे, शहरात विविध भागांत फूड कोर्ट विकसित करणे, रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणा-या व्यावसायिकांसाठी विक्री क्षेत्र विकसित करणे, कच-याचे विलगीकरण सुनियोजित करण्यासाठी हस्तांतरण स्थानके विकसित करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिटी सेंटरचा विकास करणे, महानगरपालिकेची नवीन  प्रशासकीय इमारत बांधणे, एमआयडीसी क्षेत्रामध्ये मटेरियल रिकव्हरी सुविधा उभारणे, उच्च कार्यक्षमता असलेले क्रीडा केंद्र सुरु करणे आदी महत्वपूर्ण उपक्रम, योजना आणि प्रकल्पांचा समावेश आहे

Share this: