बातम्या

सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा महामोर्चा

पिंपरी(वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आणि करदात्या जनतेची प्रचंड लूट केल्याने आता विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. गेल्या पाच वर्षांतील असंख्य प्रकऱणांचा पंचनामा करायचा विडाच राष्ट्रवादीने उचलला आहे. स्मार्ट सिटीसह सगळी भ्रष्टाचाराची प्रकऱणे लोकांसमोर आणायची आणि भाजपाचा बुरखा फाडायचा यासाठी आज शुक्रवारी(दि. 18)रोजी महापालिका भवनावर एका भव्य मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले.

“आमदारांचे ठेकेदार महाठग”, “रस्ते खोदकामात देखील केला महाभ्रष्टाचार”, “भ्रष्टाचारी भाजपचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, “सत्ताधारी भाजपाने जनतेचा विश्वासघात केला”, “करदात्या जनतेची लूट केली, लुटारु भाजपा” ‘भष्ट्राचारी भाजप चले जाव”, “अबकी बार सौ के पार” असा जोरदार घोषणाबाजी करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात महापालिका भवनावर अतिविराट मोर्चा काढला. मोर्च्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचे शहरातील नेते, सर्वसेलचे पदाधिकारी एकजुटीने मोर्चात सहभागी झाले होते. सर्वांनी भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार केला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वखालील पहिलाच मोर्चा मोठा यशस्वी झाला.

चिंचवड स्टेशन ते महापालिका भवनापर्यंत काढलेल्या या मोर्चात पक्षाचे पदाधिकरी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चात पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी शहाराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, माजी महापौर, समन्वयक योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, शकुंतला धराडे, नगरसेवक डब्बू आसवानी, मोरेश्वर भोंडवे, नाना काटे, मयुर कलाटे, शाम लांडे विनोद नढे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, नगरसेविका वैशाली काळभोर, संगीता ताम्हाणे, पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका असे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ”शहरातील सर्व घटकांना विश्वास देण्याचे, सर्वांच्या हाताला काम देण्याचे काम शरद पवारसाहेब, अजितदादांनी केले. त्यांच्या नेृत्वाखाली झालेल्या विकासामुळे शहराची जगभरात ओळख निर्माण झाली. बारामतीपेक्षा अजितदादांनी शहरावर प्रेम केले. त्यांच्यामुळेच शहराला बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळाला. शहर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पण, मागील पाच वर्षात भाजपचा कोणता नेता शहरात आला. भाजपने पाच वर्षापूर्वी सत्तेत येण्यासाठी ‘ना भय, ना भ्रष्टाचार’चा नारा दिला. पण, प्रत्यक्षात महापालिकेची लूट केली. या लोकांना अजितदादांनीच मोठे केले होते. या लोकांनी दादांशी गद्दारी केली. शहरातील जनता भाजपला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केवळ जनतेची फसवणूक केली. महापालिकेत फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराशिवाय एकही काम भाजपच्या राजवटीत झाले नाही. प्रत्येक कामात रिंग केली. सल्लागार, ठेकेदार यांचेच आहेत. कामाची टक्केवारी घेऊन थांबले नाहीत. तर, प्रत्येक कामात भाजपचे लोक भागीदार आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकांना आता घरी पाठविण्याची वेळ आली आहे”.

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, अजितदादांच्या नेतृत्वाखाली 15 वर्ष नियोजनबद्ध विकास केला. 2017 पूर्वी भाजपवाले केवळ भ्रष्टाचार शब्दाचा जप करत होते. लोकांना खोटे रेटून सांगितले. पण, मागील पाच वर्षात भाजपने उतमात केला. भ्रष्टाचाराचा अतिरेक केला. स्थायी समितीतील टक्केवारी सर्वजण बघत आहेत. प्रत्येक कामात भाजप पदाधिका-यांचे भाऊ, नातेवाईक, जवळचे लोक भागीदार आहेत. भाजपच्या दबावामुळे महापालिकेत काम करायला ठेकेदार घाबरतात. प्रत्येक कामात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचारविरहित एकही काम केले नाही.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक विकासकामे झाली आहेत. शहराध्यक्ष पदाची जबाबदारी अजित गव्हाणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. येत्या पालिका निवडणूकीत राष्ट्रवादीची ताकद दाखवून आपल्याला द्यायची आहे. माजी शहाराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मागील पाच वर्षात भाजपने केलेल्या भ्रष्टाराचा पाढा वाचला आणि भ्रष्टाचारी भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचे आवाहन केले.

Share this: