बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

घरकुल लाभार्थ्यांना ती चूक पडली महागात ;अखेर पालिकेने केले घर रद्द

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या घरकूल योजनेतील दोन लाभार्थ्यांचे घर रद्द करण्यात आले आहे. चिखलीतील घरकुल योजनेतील दोन लाभार्थ्यांनी करारनाम्याचे उल्लंघन केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले . त्यामुळे दोन सदनिका धारकांचा लाभ पालिकेने रद्द केला आहे. त्यांनी भरलेली रक्कम जप्त करुन त्याचा ताबा महापालिकेकडे घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी ही कारवाई केली.


जिलानी शमसुद्दीन अन्सारी आणि विजय संभाजी कबाडे असे लाभ रद्द करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे नाव आहे.

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 10 वर्षापर्यंत सदनिका भाड्याने, विक्री करणे अथवा नातेवाईकास मित्रास, परीचितास पोट भाड्याने देणे अथवा दान तारण ठेवता येत नाही.अशा प्रकारचा करारनामा लाभार्थ्यांबरोबर झाला आहे . मात्र अनेकांनी सदनिका भाड्याने दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या. आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाने 4 सप्टेंबर 2021 व 2 ऑक्टोबर 2021 रोजी 5 हजार 838 सदनिकांची पाहणी केली होती.त्यावेळी 293 भाडेकरु 91 नातेवाईक 721 बंद 5 विक्री आणि स्वत : वापरत असलेले 4 हजार 728 सदनिकांचा वापर होत असल्याचे आढळून आले होते. या सर्व लाभार्थ्यांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली होती.

त्यापैकी विक्री केल्याची माहिती प्राप्त झालेल्या पाच लाभार्थ्यांपैकी एका लाभार्थ्यांचा खुलासा मान्य झाला. उर्वरीत लाभार्थींना आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष सुनावणीसाठी 5 मार्च 2022 रोजी बोलविण्यात आले होते. या सुनावणीसाठी दोन लाभार्थ्यांनी उपस्थित राहून आपले म्हणणे सादर केले. तर जिलानी शमसुद्दीन अन्सारी इमारत क्र . ए- 33 सदनिका क्रमांक 103 आणि विजय संभाजी कबाडे इमारत क्रमांक बी 14 सदनिका क्रमांक 502 हे अनुपस्थित राहिले. त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही या लाभार्थ्यांनी अटी व शर्तींचा भंग केल्याने त्यांचा घरकुल योजनेतील सदनिकेचा लाभ रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

Share this: