बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तब्बल दोन वर्षानंतर रमजान ईद उत्साहात साजरी

पिंपरी (वास्तव संघर्ष ): कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुस्लिम बांधव ईद घरीच साजरी करत होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने देखील ईद पारंपारिकपणे साजरी करण्यास परवानगी दिली. पिंपरी-चिंचवड शहरात आज (मंगळवारी) तब्बल दोन वर्षानंतर रमजान ईद मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली.

रमजान महिन्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहू अलैही व सल्लम याचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो. या महिन्याची सुरूवात 2 एप्रिल रोजी चंद्रदर्शनाने झाली. त्याच्या दुसर्‍या दिवसापासून म्हणजे 3 एप्रिलपासून लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील मुस्लिम बांधवांनी रोजा (उपवास) महिनाभर केला. या महिनाभरात रोजा, नमाज, रात्रीची तराबिह विशेष नमाज, शबे कद्रची रात्र, कुरआन पठण, जकातुल फित्र आदी संपन्न झाले. अनेक बांधवांनी पाच वेळची नमाज पठण केली. काल चंद्रदर्शन झाल्यामुळे आज पिंपरी-चिंचवड शहरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

भल्या सकाळीच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून, अत्तर, सुवासिक तेल लावून सगळ्यांची पावले जवळच्या मजीद व मदरसाकडे वळाली. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहनननर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, निगडी, आकुर्डी, दळवीनगर, कासारवाडी, दापोडी आदी परिसरात मजीद व मदरसामध्ये मौल्लानांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला, नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्या मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

चिंचवडगाव येथील आलमगीर शाहिद मजीद मध्ये मौलाना मिनहाज उद्दीन यांनी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले. या रमजान महिन्यामध्ये शुक्रवारची व रमजान सणाच्या वेळेला जशी नमाज पठण करता, तसे न करता नियमित दररोज पाच वेळेस नमाज पठण करावे. ज्या चुका केलेल्या आहेत. त्याची क्षमा अल्लाह जवळ मागा, सत्याची कास अंगिकारा, मुलांवर चांगले संस्कार आई-वडीलांनी करावे, असे आवाहन करून रमजान सणाची माहिती विषद केली.

यावेळी आलमगीर शाही मजीदचे पदाधिकार्‍यांनी पोलीस उपायुक्त मंचक अप्पर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देताना उपायुक्त मंचक अप्पर म्हणाले, “आज तुमचा मोठा आनंदाचा दिवस आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली 2 वर्षे घरीच ईद साजरी केली. मुस्लिम बांधवांनी एकोपाने राहून एकमेकांच्या सुखःदुखात सामिल होत समाज एकोपाचे दर्शन घडवावे”. यावेळी माजी महापौर आझम पानसरे, निहाल पानसरे यांच्या उपस्थितीत इम्रान पानसरे, अख्तर पिंजारी, नाजीम बसरी, इक्बाल शेख, इक्बाल मुलानी आदींनी संयोजन केले. यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Share this: