दोन लाखांची लाच स्वीकारताना महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक
निगडी (वास्तव संघर्ष) : हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन सील न करण्यासाठी आणि गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाख स्वीकारताना महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई निगडी येथे गुरुवारी ही करण्यात आली आहे.
याप्रकरणी एका 62 वर्षीय महिला डॉक्टरने फिर्याद दिली आहे.
नलिनी शंकर शिंदे(वय-32, रा. पोलीस अधिकारी वसाहत सिंधूदुर्ग ) असे अटक केलेल्या लाचखोर महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांचे निगडित हॉस्पिटल आहे. तर नलिनी शिंदे या सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला अत्याचार निवारण कक्षात काम करतात . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास नलिनी शिंदे यांच्याकडे आहे.या गुन्ह्याच्या तपासासाठीच त्या निगडी येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी फिर्यादी यांच्या हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन सील न करण्यासाठी आणि गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती हा सर्व व्यवहार दोन लाख रुपयात ठरला. मात्र लाच देणे मान्य नसल्याने संबंधित महिला डॉक्टरने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांना लाच स्वीकारताना अटक केली. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.