पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदावर माई ढोरे तर उपमहापौर पदी तुषार हिंगे यांची निवड
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पदासाठी उषा उर्फ माई ढोरे यांना ८१ मते तर स्वाती उर्फ माई काटे यांना ४१ मते मिळाल्याने सर्वाधिक मते प्राप्त उषा उर्फ माई ढोरे यांची महापौर म्हणून निवड झाल्याचे पिठासिन प्राधिकारी तथा पुणे महानगरपालिकेच अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांनी जाहीर केले. तसेच उपमहापौर पदासाठी तुषार हिंगे यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी जाहीर केले.
आज सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेल्या पिठासिन प्राधिकारी तथा पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, नगरसचिव उल्हास जगताप, नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित होते.
महापौर पदासाठी स्वाती उर्फ माई काटे व उषा उर्फ माई ढोरे यांचे प्रत्येकी दोन अर्ज प्राप्त झाले होते. उमेदवारी अर्जाची छानणी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येत असल्याचे पिठासिन प्राधिकारी शंतनू गोयल यांनी जाहीर केले. तथापि दिलेल्या मुदतीत कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने मतदान प्रक्रीयेस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर उषा उर्फ माई ढोरे यांना ८१ मते तर स्वाती उर्फ माई काटे यांना ४१ मते मिळाली. त्यामुळे सर्वाधिक मते मिळाल्यामुळे उषा उर्फ माई ढोरे यांची महापौर म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
त्यानंतर उपमहापौर पदासाठी राजू बनसोडे व तुषार हिंगे यांचे प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. अर्जांची छानणी झाल्यानंतर उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनीटांचा कालावधी देण्यात आला होता. तथापि दिलेल्या मुदतीत राजू बनसोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे तुषार हिंगे यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे पिठासिन प्राधिकारी शंतनू गोयल यांनी जाहीर केले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन केले.