एटीएम चोरांचा मास्टरप्लॅन ;प्रथम पासवर्ड टाकून एटीएम मशीन उघडले आणि नंतर…
तळेगाव (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरात चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे त्यातच एटीएम मशीन फोडण्याचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. एटीएम मशीन फोडण्यासाठी गन मशीन ते गॅस कटरचा उपयोग होताना दिसत आहे. मात्र आता काही एटीएम मशीन चोरट्यांनी मास्टरप्लॅन करत एटीएमचा मुख्य पासवर्डच वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गुरुवारी ( दि. 14 )रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकातील एचडीएफसी बँकेचे एटीएममध्ये घडला.
पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकातील एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. त्यातून चोरट्याने एकूण 5 लाख 82 हजार 500 रुपये चोरून नेले.संबधीत चोरट्यांनी प्रथम एटीएम मशीनचा पासवर्ड टाकून मशीन उघडले आहे.
तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चोरट्यांनी एटीएम मशीन राॅकेल किंवा डिझेलने पेटवून दिले.घटनास्थळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपयुक्त परिमंडळ-2 आनंद भोईटे,देहुरोड सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले, तळेगाव पोलीस निरीक्षक लांडगे,आणि दरोडा पथक पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असून पोलीस परीसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत. दरम्यान रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व बँकांनी त्यांच्या एटीएम मशीन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व एक सुरक्षा रक्षक ही नेमावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.