बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पिंपरी (वास्तव संघर्ष) : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले. या देशाची वाटचाल खूप उल्लेखनीय सुरु असून भारताने वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक ध्येये पादाक्रांत केली आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर देखील स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेले  आहे. आज देशात अनेक क्षेत्रात प्रगती झाली असून देशाच्या राष्ट्रपतीपदी एक आदिवासी महिला विराजमान आहे , हेच आपल्या देशाच्या यशाचे मोठे उदाहरण आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.   

 पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महापालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दल तसेच तृतीयपंथी ग्रीन मार्शल, रिव्हर मार्शल आणि सुरक्षा दलाच्या  वतीने सलामी देण्यात आली. अग्निशामक दलाच्या वतीने पाण्याच्या तुषारांद्वारे भारतीय तिरंग्याची प्रतिकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी  ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ असा नारा देत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रभातफेरी काढली. आज महापालिकेत  रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मिळून सुमारे २०० जणांनी रक्तदान करून मानवतेच्या महान कार्यामध्ये सहभाग नोंदवला.

राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लेखापरिक्षक राजेंद्र भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, उपआयुक्त  रविकिरण घोडके, चंद्रकांत इंदलकर, संदिप खोत, विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, सचिन ढोले, मनोज लोणकर, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. उज्वला आंदूरकर, डॉ. मनिषा सूर्यवंशी, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण,  मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वामन नेमाणे, बाळासाहेब खांडेकर, सुषमा शिंदे, निलेश देशमुख, श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, बाळासाहेब गलबले, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. वर्षा घोगरे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक नामदेव ढाके, अमित गावडे, गोविंद पानसरे,कर्मचारी महासंघाचे आजीमाजी अध्यक्ष बबन झिंजुर्डे, अंबर चिंचवडे  यांच्यासह  महापालिका कर्मचारी तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना आयुक्त पाटील म्हणाले, न्यू सिटी म्हणून नावारूपाला आलेल्या या कामगारांच्या शहराने  आज एक स्मार्ट सिटी तसेच एक आधुनिक शहर म्हणून स्वतःची ओळख निर्माण  केली आहे.   शहरात गेल्या काही वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत. यामध्ये सर्वांनीच मोलाची भूमिका बजावली आहे. नागरिकांच्या सहभागातून अनेक उपक्रम राबवून ते यशस्बी केले आहेत. सर्वाधिक चांगली वैद्यकीय सेवा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करत आहोत.  शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये 24तास सर्व सेवा उपलब्ध होत आहेत. यामध्ये आगामी काळात महापालिकेच्या नवीन दोन रुग्णालयांचा समावेश होणार आहे. शहरात जिजाऊ क्लिनिक लवकरच सुरु करण्यात येणार आहे. पॅरामेडिकल तसेच वैद्यकीय कॉलेज देखील सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेने वेगळ पाऊल टाकले आहे. पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वात स्वच्छ तसेच  सुंदर शहर करण्यासाठी वेगेवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यत 90 टक्क्यांपर्यंत कचरा विलगीकरण होत असून ऑक्टोबरपर्यंत तो 100 टक्क्यांपर्यंत विलगीकरण करण्यासाठी वाटचाल सुरु आहे.  पुढील काळात शहराला स्पोर्ट्स हब म्हणून नावारूपाला आणण्यासाठी काम सुरु आहे. नेहमीच दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथियांचा समावेश करून महापालिकेच्या विविध विभागांमध्ये त्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत.  या नवीन संकल्पनेसह अनेक नवीन उप्रक्रम महापालिका सर्वांच्या सहभागातून राबवत आहे, हाच सहभाग निरंतर राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,  असे  आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

दरम्यान, निगडी भक्ती शक्ती उद्यान या ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर शालेय  विद्यार्थ्यांनी  मानवी साखळीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजासह विविध प्रतिकृतींचे सादरीकरण करून उपस्थित सर्वांच्याच मनावर राज्य केले.  यामध्ये ज्ञानप्रबोधिनी शाळा तसेच महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात  आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते मनपाच्या वतीने अधिका-यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई-वाहनांचे, अग्निशामक विभागाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या अत्याआधुनिक अग्निशमन वाहनांचे, मनपा मुख्यालय येथे प्लास्टिक मुक्त अभियाना अंतर्गत स्वस्त व वाजवी दरातील कापडी पिशव्यांच्या वेंडिंग मशीनचे तसेच मनपा मुख्यालय येथे लावण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले. मनपाच्या वतीने राबविण्यात येणा-या बेस्ट फ्रॉम वेस्ट या स्पर्धेचा देखील शुभारंभ आयुक्त पाटील यांच्या करण्यात आला.

महापालिकेच्या वतीने करसंकलन विभागातील करवसुलीचे काम तृतीयपंथीयांच्या शलाका पथकाला देण्यात आले असून त्याचे नियुक्ती पत्र आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच रिव्हर मार्शल म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांना देखील आयुक्त  पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. मनपाच्या आरोग्य सेवेमध्ये 25 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचा-यांना महापालिकेच्या वतीने सोडतीद्वारे मोफत सदनिका वाटप करण्यात आले होते. त्यातील लाभार्थ्यांना देखील आयुक्त पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. तर आभार  प्रफुल्ल पुराणिक मानले.

Share this: