” तुमच्या मुलीशी लग्न लावून द्या, नाहीतर मी आत्महत्या करेन” शाळकरी मुलीची पोलीसांकडे धाव
पिंपरी(वास्तव संघर्ष) : शाळा आणि क्लासच्या ठिकाणी मुलीचा पाठलाग करुन एक रोड रोमियो तिला त्रास देत होता. इतकेच करून तो थांबला नाहीतर त्याने मुलीच्या आईवडीलाकडे जाऊन लग्नाची गळ घालत आत्महत्येची धमकी दिली. ही घटना पिसिएमसी कॅालनी अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरू नगर येथे मंगळवारी (दि.16 ) घडली.
या प्रकरणी पीडित 15 वर्षीय मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुमित सुखदेव रागपसरे (वय 18 रा. नेहरूनगर, पिंपरी) या आरोपी विरोधात पोलिसांनी ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी खराळवाडी येथील शाळेत शिक्षण घेते. तसेच ती नेहरूनगर येथे खाजगी क्लासला जाते. आरोपीने जून महिन्यापासून तिचा शाळा आणि क्लासच्या परिसरात पाठलाग केला. मुलीने त्याच्याशी फोनवर बोलावे यासाठी त्याने तिला आग्रह केला. मात्र मुलीने त्यास नकार दिला. तरीही आरोपीने वारंवार मुलीचा पाठलाग केला. त्याने 16 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी यांच्या घरी जात मुलीच्या आई वडीलाकडे लग्नाची मागणी घातली तसेच माझे तुमच्या मुलीवर प्रेम असून तिच्याशी लग्न लावून द्या नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे-वाईट करून घेईन, अशी धमकी दिली. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.