पिंपरी(वास्तव संघर्ष): भोसरी, खंडेवस्ती झोपडपट्टी पुनर्वसनासाठीच्या सर्वेक्षणादरम्यान घरावर नंबर टाकण्यास विरोध करणाऱ्या महिलेप्रती पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्राच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर हे कसे मुजोर आणि अंसवेदनशीलपणाने वागले याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. घरावर नंबर टाकल्यास मी काही तरी करून घेणार असे म्हणणाऱ्या त्या महिलेला “काय करायचे ते करा काही अडचण(प्रॉब्लेम) नाही मला”, असे राजेंद्र निंबाळकर उत्तर देताना या व्हिडीओत दिसत आहेत. निंबाळकर यांच्या या असंवेदनशीतेबाबत झोपडीधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात राजेंद्र निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता “मग काय झाले?, ठीक आहे, ओके लक्षात आले माझ्या”, अशी मुजोर प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पहा व्हिडीओ खालील लिंकवर
भोसरी, खंडेवस्ती येथील झोपडपट्टीच्या पुनर्वसनाला तेथे राहणाऱ्या झोपडीधारकांचा तीव्र विरोध आहे. त्याकडे दुर्लक्ष करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत (एसआरए) खंडेवस्ती झोपडपट्टीत सर्वेक्षण केले जात आहे. पुनर्वसनासाठी तेथे राहणाऱ्या ७५ टक्के नागरिकांनी संमती दर्शवल्याचे एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांचे म्हणणे आहे. पण फोटो पास द्यायचे असल्याचे सांगून संमतीपत्रावर आमच्या सह्या घेण्यात आल्याचे तेथील झोपडीधारकांचे म्हणणे आहे. पण झोपडीधारकांच्या म्हणण्याला काडीचीही किंमत न देता एसआरएमार्फत तेथे सर्वेक्षण केले जात आहे.
या सर्वेक्षणासाठी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर हे मंगळवारी (30 ऑगस्ट) स्वतः खंडेवस्ती झोपडपट्टी येथे उपस्थित होते. पोलिस बंदोबस्तात सुरू असलेल्या या सर्वेक्षणादरम्यान एका महिलेने तिच्या घरावर नंबर टाकण्यास विरोध केला. त्या महिलेला राजेंद्र निंबाळकर यांनी ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. महिला पोलिस त्या महिलेला ताब्यात घेण्यासाठी तिच्या घरात घुसू लागले. त्याचवेळी त्या महिलेने माझ्या घरावर नंबर टाकल्यास मी काही तरी करून घेणार, असा इशारा दिला. वरिष्ठ अधिकारी असलेले राजेंद्र निंबाळकर यांनी हे प्रकरण संयमाने हाताळण्याची आवश्यकता होती. त्यांनी तसे न करता “काय करायचे ते करा, काही प्रॉब्लेम नाही मला”, असे म्हणत असंवेदनशीलपणा दाखवला.
या सर्व प्रकाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी त्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांसोबत अधिकारी कशा पद्धतीने वागतात, हे स्पष्ट होते. राजेंद्र निंबाळकर यांच्या या असंवेदनशीपणाबाबत खंडेवस्ती झोपडपट्टीतील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्या महिलेने स्वतःच्या जिवाला खरोखरच काही तरी बरे वाईट करून घेतले असते, तर राजेंद्र निंबाळकर यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली असती का?, असा सवाल नागरिक करत आहेत.
यासंदर्भात एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून तुम्ही एक वरिष्ठ अधिकारी असूनही त्या महिलेसोबत असंवेदनशीलपणे वागलात हे बरोबर आहे का?, असा सवाल केला असता मग काय झाले? ठीक आहे ओके लक्षात आले माझ्या, असे म्हणून त्यांनी फोन कट केला. त्यांच्याशी दुसऱ्यांदा फोनवर संपर्क साधला असता ते म्हणाले, “झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खंडेवस्तीतील ७५ टक्के झोपडीधारकांनी संमती दिली आहे. पुनर्वसनाला तेथील लोकांचा विरोध असेल, तर त्यांनी आमच्या वरिष्ठाकडे तसे लेखी म्हणणे मांडावे. लोकांनी स्वतःच्या तोंडाची वाफ घालवून उपयोग नाही. ती महिला काय म्हणते याने मला फरक पडत नाही. लोकांनी कायदा समजून घ्यावा. त्यांचा पुनर्वसनाला एवढाच विरोध असेल आणि खोटे सांगून संमतीपत्रावर त्यांच्या सह्या घेतल्या असतील तर त्यांनी खुशाल कोर्टात जावे.”