स्मिता झगडे क्लिनबोल्ड;अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप जांभळेपाटील यांची नियुक्ती
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या बदली नंतर लगेच काही दिवसानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची पुन्हा भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेत उचलबांगडी करण्यात आली होती.त्यांच्या जागी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली होती.
मात्र; जबरदस्त फिल्डिंग लावून देखील स्मिता झगडे या क्लिनबोल्ड झाल्या आहेत. अशीच चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.त्यांना पुन्हा महापालिकेच्या उपायुक्त पदी जैसे थेच ठेवण्यात आले आहे.याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (गुरूवारी) काढले आहेत.
शासन आदेशानात म्हटले आहे ,प्रदिप बाबुराव जांभळे- पाटील सध्या प्रतिनियुक्ती उपायुक्त वसई विरार महानगरपालिका यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-39 अ नुसार अतिरिक्त आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या पदावर दोन वर्षाच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.प्रदिप बाबुराव जांभळे पाटील यांनी उपायुक्त वसई – विरार महानगरपालिका या पदावरुन कार्यमुक्त होऊन प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.