नागरिकांपर्यंत विविध माहिती पोहचवण्यासाठी जनसंवाद सभांचा आधार घ्या-अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप
पिंपरी (वास्तव संघर्ष): शहरात असणाऱ्या महत्वपूर्ण सोयी सुविधा तसेच शहराच्या दृष्टीने माईलस्टोन ठरणाऱ्या प्रकल्प, उपक्रम आणि योजनांची माहिती प्रत्येक नागरिकाला असावी, यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी नागरी सहभाग घेतल्यास माहितीचे वहन सहजतेने करता येईल. त्यादृष्टीने जनसंवाद सभा देखील माहितीच्या आदान प्रदानासाठी प्रभावी माध्यम असून अधिकाऱ्यांनी नागरिकांपर्यंत विविध माहिती पोहचवण्यासाठी जनसंवाद सभांचा आधार घ्यावा, असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी मांडले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब महापालिकेच्या ध्येय धोरणे, विविध निर्णयात दिसावे तसेच शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्याच्या हेतूने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. ब क्षेत्रीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी नागरिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
जगताप म्हणाले, शहरात असलेले दुर्गादेवी टेकडी, भक्ती शक्ती उद्यान, बर्ड व्हॅली, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान, तारांगण, सायन्स पार्क, मारुतराव लांडगे आंतराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, मेजर ध्यानचंद पॉलीग्रास हॉकी स्टेडीयम, वेंगसरकर क्रिकेट अकादमी, विविध क्रीडा संकुले, जलतरण तलाव, डॉग पार्क, विविध रुग्णालये, दवाखाने, प्राथमिक व माध्यमिक शाळा, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र, विविध सभागृह, नाट्यगृह, विरंगुळा केंद्र, सांस्कृतिक सभागृह, अभ्यासिका, ग्रंथालये, समाज विकास विभागामार्फत विद्यार्थी, महिला, दिव्यांग, विधवा, मागासवर्गीय, अनाथ, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, तसेच इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशासनातील कामकाजात अद्ययावत संगणक प्रणालीचा वापर, नारिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या सारथी अॅप सह विविध माहितीचे नागरिकांपर्यंत सहजपणे वहन होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभांचा आधार घ्यावा, यामुळे शहरामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, सेवा सुविधा यांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले