बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

ठराविक विचारांच्या शक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्याच्या प्रयत्नात-अभिनेते महेश कोठारे

पिंपरी(वास्तव संघर्ष): संविधानाच्या माध्यमातून आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. अभिव्यक्त होण्यासाठी नाटक, सिनेमे हे प्रभावी माध्यम असून ते समाजाचे प्रतिबिंब असते. परंतु, अजूनही दिग्दर्शक किंवा कलाकाराला आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांसमोर अभिव्यक्त होत असताना  अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असते. सजग राहूनच प्रत्येक  कलाकृती निर्माण करावी लागते, अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते. काही ठराविक विचारांच्या शक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी  करण्याच्या प्रयत्नात असतात तर काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा देखील घेतात. असे असले तरी सामाजिक भान ठेऊन   अभिव्यक्त झाल्यास खरे स्वातंत्र्य निश्चितपणे उपभोगता येईल, असा सूर ‘माध्यमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने’ या विषयावरील  महाचर्चेत उमटला.

संविधान दिवसाचे औचित्य साधून संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने दि.२६ आणि २७ नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘माध्यमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने’ या विषयावर महाचर्चा आयोजित केली होती. यामध्ये चित्रपट दिग्दर्शक तथा सिनेअभिनेते महेश कोठारे, अभिनेते संदीप पाठक आणि राजकुमार तांगडे सहभागी झाले होते. सूत्रसंचालन वृत्तवाहिनी निवेदक प्रसन्न जोशी यांनी केले.

अभिनेते महेश कोठारे म्हणाले, माझे आणि संविधानाचे वेगळे नाते आहे. कायद्याचे शिक्षण घेत  असताना भारतीय संविधानाचा बारकाईने अभ्यास केला, तेव्हा हे संविधान किती प्रभावी आहे याची जाणीव झाली. सर्वांना सामावून घेणा-या या  संविधानाचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. हे करताना कोणत्याही प्रकारचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. मनोरंजन क्षेत्रात काम करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचा भाग असतो. मात्र कलाकृती निर्माण करताना काही गोष्टींवर मर्यादा येतात. आता तर लोकांच्या भावना अधिक टोकदार झाल्या आहेत. त्यामुळे सदसदविवेकबुद्धी जागृत ठेऊन कलाकृती निर्माण  केली पाहिजे.  

अभिनेते संदीप पाठक म्हणाले, भारतीय संविधानाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला मिळाले असले तरी नाटक आणि चित्रपटातील भूमिका आणि पात्रांची नावे काय ठेवावी यासाठी खूप विचार करावा लागतो. एखादा विनोद करतानाही खूप विचारपूर्वक आणि जबाबदारीने करावा लागतो.  पूर्वी राजकारण आणि चालू घडामोडींबद्दल नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून संवाद, टिपणी केली जायची. पण आता टोकदार भावना वाढीस लागून विरोधातील टीका सहन करण्याचा दिलखुलासपणा कमी झाल्याने असे मांडणे कमी झाले आहे.   हे त्याचेच उदाहरण आहे. सर्व गोडगोड व्यक्त होत जावे अशी धारणा निर्माण झाली आहे. कोणत्या शब्दाने काही अनर्थ घडेल कि काय अशी भीती सतत वावरत असते.  त्यामुळे कलाकारांना अभिव्यक्त होताना मर्यादा येतात. यातून मार्ग काढून माध्यमांनी ख-या अर्थाने समाजाचे प्रतिबिंब झाले पाहिजे, असे मत पाठक यांनी मांडले.

अभिनेते राजकुमार तांगडे म्हणाले, समाजात राजकारण महत्त्वाचे आहे. परंतु, ते करणारे चांगले असणे गरजेचे आहे. मी ग्रामीण भागातून कलेच्या प्रांतात आलो. शेतकर-याच्या मुलाला  संविधानामुळे मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक साकारणे शक्य झाले, याचे समाधान आहे. कोत्या मनाची माणसे माध्यमावर आपली सत्ता अबाधित ठेऊ इच्छितात, त्यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे असून आपल्या भूमिका उघडपणे मांडण्यासाठी कलाकारांनी पुढे आले पाहिजे. विशिष्ट जातीच्या नावाने पूर्वी पात्रांची नावे कलाकृतीत असायची, आता त्या जातीतील व्यक्ती  उच्चशिक्षित होऊन  प्रगतीपथावर आली आहेत. त्यामुळे आता कलाकृती निर्मात्यांना या गोष्टींची दखल घ्यावी लागत असून कलाकृतीतील नावे बदलली जात आहेत, ही चांगली बाब असून अभिव्यक्त होत असताना इतरांना दुय्यम समजून अभिव्यक्त होणे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे.  असे मत तांगडे यांनी व्यक्त केले.

प्रसन्न जोशी यांनी विविध विषयावर प्रश्न विचारून महाचर्चेतील कलाकारांना बोलते केले. वास्तव परिस्थितीवर प्रश्न विचारून माध्यमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्याला थेट हात घालून दुर्लक्षित मुद्यांना पुढे आणले. जयभीम, काला या चित्रपटांचा संदर्भ देत दक्षिण चित्रपटसृष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत दृश्य सहज दाखवते, मात्र हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीला असे आतापर्यंत का जमले नाही असा परखड  प्रश्न जोशी यांनी  विचारून  सिनेमाध्यमातील दुहेरी मापदंडाबद्दल  खंत व्यक्त केली.   

या महाचर्चेत सहभागी मान्यवरांचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी शब्दसुमनांनी स्वागत केले.  सिनेअभिनेते महेश कोठारे यांचा परिचय संतोष जोगदंड यांनी करून दिला. अभिनेते संदीप पाठक यांचा पौर्णिमा भोर यांनी, अभिनेते राजकुमार तांगडे यांचा परिचय अभिजित डोळस यांनी तर वृत्तवाहिनी निवेदक प्रसन्न जोशी यांचा परिचय शाम सोनवणे यांनी करून दिला. या महाचर्चेला माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, पञकार दिपक साबळे,रयत विद्यार्थी मंचाचे धम्मराज साळवे,राजेंद्र साळवे,संतोष शिंदे, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this: