स्वच्छता कंत्राट म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण ;शहरातील स्वच्छतेचा उडाला बोजवारा
पिंपरी(वास्तव संघर्ष) : एकीकडे स्वच्छता अभियान अंतर्गत दरवर्षी स्वच्छता सर्वेक्षणसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून करोडो रुपयांचा निधी खर्च होत आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे शहरातील विविध भागात फेरफटका मारल्यावर दिसते. शहरात अनेक प्रभागात सार्वजनिक स्वच्छता अबाधित राखण्यासाठी महापालिका प्रशासन व संबंधित विभागातील अधिकारी प्रचंड उदासीन असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. सेक्टर क्र 22 हद्दीतील येथील अनेक रहिवासी भागांत स्वच्छता कर्मचारी व घंटागाडी नियमित येत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले अशीच स्थिती शहरातील अन्य रहिवासी भागांची असल्याने स्वच्छता विभाग व संबंधित अधिकार्यांविरोधात नागरिकांत मोठ्या प्रमाणावर रोष वाढत आहे. शहरातील गटारे तुंबलेली असतात. कचराचा वेळेवर उचल होत नसल्याने कुत्री, डुकरे व मोकाट प्राणी कचरा रस्त्यांवर आणतात व रस्त्यांवर कचराच कचरा होत असल्याचे चित्र आहे.
शहरातील कचर्याची उचल करण्यासाठी वर्षाला कोट्यावधी रूपये खर्च केला जातो. मात्र रस्त्याशेजारी कचरा साचण्याचे प्रकार जैसेथे आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरातील रस्त्याशेजारी कचरा साचून दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेच्या अधिकार्यांचे नियंत्रण नसल्यानेच शहराच्या जागो जागी अस्वच्छता निर्माण होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.कचर्याची उचल वेळेवर केली जात नसल्याने रस्त्या शेजारी कचरा साचत असल्याचे निदर्शनास येत आहे.
स्वच्छतेकडे अधिका-यांचा कानाडोळा
महापालिकेतील सर्वच अधिकारी स्वच्छतेकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छता वेळेवर आणि व्यवस्थित होत नाही. महापालिकेच्या अधिकार्यांनी विविध भागात जावून पाहणी करणे आवश्यक आहे पण सुपरवायझर आणि मुकादमांवर स्वच्छतेची जबाबदारी देवून स्वच्छता निरीक्षक आपल्या अन्य कामात व्यस्त असतात. त्यामुळेच कोट्यावधी रूपये खर्च करूनही शहर स्मार्ट बनत नसल्याच्या प्रतिक्रिया शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाकडूनच नियमावलीचे पालन होणे आवश्यक आहे.
स्वच्छता कंत्राट म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण
काही भागात दररोज कचरावाहू वाहने येतात तर काही भागात ते दिवसाआड वाहने कचरा घेण्यासाठी येतात. त्यामुळे नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. कचरा साचून दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी वाढत आहे स्मार्ट सिटीमधील कचराकुंडय़ा हद्दपार झाले असल्याने रस्त्या शेजारी कचर्याचे ढिगारे जैसे थे आहेत.अशामुळे स्मार्ट सिटी कशी बनणार अशी विचारणा नागरिक करीत आहेत. स्वच्छता कंत्राट म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.