बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संस्कृतीचे जतन करणारा ‘वासुदेव’

पिंपरी (वास्तव संघर्ष) :खेड्यापाड्यात पहाटेच्या वेळी दिसणारे वासुदेव दर्शन आज मितीला दुर्मिळ झाले आहे. खेड्यापाड्यातून चक्क पिंपरी चिंचवड या शहरात आज सोमवारी (दि.30)जानेवारी रोजी या दुर्मिळ झालेल्या वासुदेवाचे दर्शन शहरवासीयांना झाले. एकिकडे शहराचा विकास होत असताना महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती टिकवण्याचे काम शहरात देखील वासुदेव करताना दिसत आहेत.

सकाळच्या प्रहरी वासुदेव दारी.. ‘दान पावलं’ म्हणत पहाटे लोकांना दारोदारी जाऊन उठवणारा वासुदेव नित्यनेमाने आपले काम प्रामाणिकपणे करताना दिसतात.सूर्योदयापूर्वी उठल्याने आरोग्य चांगले राहते म्हणूनच समाजाला लवकर उठायला भाग पाडून त्याचे आरोग्य चांगले राखण्याचे काम वासुदेव आजवर करत आला आहे. पांडुरंगाचे नामस्मरण करत समाजातील अनिष्ट चालरीतींवर आपल्या गीतांद्वारे ताशेरे ओढण्याचे काम वासुदेव करतो.

पूर्वापर चालत आलेली ही परंपरा लोप पावत असून वासुदेवाच्या या जगण्याबाबतचे जीवन चित्रच वास्तव संघर्षशी बोलताना वासुदेव प्रदीप पोपट गोंडे (रा. मेडद, ता. बारामती) यांनी सांगितले की,शहरातील तसेच खेडोपाड्यातील नागरिकांचा वासुदेवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. लहान मुले तर विदूषक समजतात. परंतु वासुदेव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून अविरतपणे चालू आहे. त्याकाळी वासुदेवांनी छत्रपतींसाठी हेरगिरीचे काम केले आहे. वासुदेव हा वर्षातील 11 महिने फिरतीवर असतो तर फक्त 1 महिना गावी असतो. सकाळी 10 पर्यंत देवाचे नामस्मरण करत फिरती केल्यावर नागाची फडी, मोरपीस लावून बनवलेला पांडुरंगाचा मुकुट व वासुदेवाचा झगा उतरून त्यानंतर मिळेल ती मजुरी करत असल्याचे गोंडे यांनी सांगितले. या लोकपरंपरेबद्दल ते म्हणतात की आमची जमात ही हिंदू मेडंगी जोशी आहे.

आज समाजातील तरुण मंडळींना ही पूर्वापर चालत आलेली परंपरा कायम राखण्याची लाज वाटते. मात्र, कोणीही परंपरा राखो न राखो आपण मात्र यात खंड पडू द्यायचा नाही, समाजाला देणे देत राहणे हे आपल काम असल्याचे वडिलांनी सांगितले. प्रत्येकाने सत्याचा मार्गाने जावे, देवाची भक्ती करावी, अनिष्ट परंपराचा नाश व्हावा, ज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी वासुदेवाचा जन्म झाला असल्याचे मत वासुदेव प्रदीप गोंडे यांनी सांगितले.

Share this: