संपूर्ण राज्यात “माता रमाई जयंती उत्सव” साजरा होण्याकरिता आदेश निर्गमित करा
पिंपरी(वास्तव संघर्ष): विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची 125 वी जयंती हि दि. 07 फेब्रुवारी, 2023 रोजी येत आहे. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे. बाबासाहेबांचे जीवन घडविण्यात रमाईंचा सिंहाचा वाटा होता. माता रमाईंनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा आहे, तो सर्व घटकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. तसेच त्यांचे कर्तृत्व नव्या पिढीला मार्गदशक, प्रेरणादायी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात “माता रमाई जयंती उत्सव” साजरा होण्याकरिता आदेश निर्गमित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत दिपक खैरनार यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली. बाबासाहेबांपर्यंत दु:खाची झळ पोहचू दिली नाही.
आपल्या संसारात आदर्श पत्नी, सून, माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्यात. कधी तक्रार नाही की कुठे त्याची वाच्यता नाही. अथांग दु:खाचे कधी भांडवल केले नाही. कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व गुण रमाईत होते. रमाईंनी बाबासाहेबांच्या अनेक सामाजिक चळवळी आणि सत्याग्रहांमध्ये सक्रिय सहभाग घेत मोठ्या प्रमाणात महिला ह्या चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणल्या. रमाईंच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे. आजच्या सद्य स्थितीत हा त्याग सर्वांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. अशा आदर्श, त्यागमयी रमाईंच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी होण्याकरिता शासन स्थरावर तात्काळ निर्णय होणे अपेक्षित आहे.
प्रतिवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महान व्यक्तिमत्त्वांची जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम होत असतो. महान व्यक्तिमत्त्वांची जयंती साजरी करताना ते महान व्यक्तिमत्त्व कोणते आहेत, याची यादी शासनाच्या वतीने वेळोवेळी प्रमाणित करण्यात येते. त्या अनुषंगाने प्रकाशित केल्या जाणाऱ्या यादीमध्ये कायमस्वरूपी “माता रमाई जयंती उत्सवाचा” समावेश करून त्याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.