खोटी कागदपत्रे तयार करुन बँकेची 40 लाखांची फसवणूक
पिंपरी (वास्तव संघर्ष) : बॅंकेला खोटी कागदपत्रे सादर करून एकाने तब्बल 40 लाखांची फसवणूक केली आहे.ही घटना वाकड परिसरात उघडकीस आली आहे. हा प्रकार डिसेंबर 2014 ते 15 फेब्रुवारी 2023 या दरम्यान लाला अर्बन को. ऑप. बँक लि. नारायणगाव, शाखा काळेवाडी येथे घडला आहे.
बँकेचे शाखाधिकारी महेंद्र बाबुराव आवटे (वय-42 रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी वाकड पोलीस फिर्याद दिली आहे.
महेश सुभाष गाते (वय-39 रा. विनोदे वस्ती, वाकड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश यांनी त्यांच्या सिद्धी निसर्ग सोसायटीमधील फ्लॅटवर अॅक्सिस बँकेचे कर्ज घेतले होते. त्यानंतर फ्लॅटची खोटी कागदपत्र तयार करुन लाला अर्बन बँकेत कर्ज मंजुरीसाठी दिली. बँकेने गाते यांना 40 लाख रुपये कर्ज मंजूर करुन कर्जाची रक्कम दिली. कर्ज घेतल्यानंतर महेश यांनी कर्जाची परतफेड केली नाही.त्यामुळे लाला अर्बन बँकेकडून महेश यांच्या फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्या फ्लॅटवर पूर्वीच अॅक्सिस बँकेने ताबा घेतल्याचे निष्पन्न झाले. आरोपी महेश याने खोटी कागदपत्र देऊन बँकेची 40 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.याबाबत महेशवर आयपीसी 165, 468, 471, 406, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.