अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा प्रचाराचा झंझावत; गृहनिर्माण सोसायट्या भाजपच्या पाठीशी
पिंपरी(वास्तव संघर्ष) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप आणि मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी (ता. 17) वाकड आणि पुनावळे भागात पदयात्रा काढून मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधला. गृहनिर्माण सोसायट्यांतील मतदारांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोसायट्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करण्याचा निर्धार वाकड आणि पुनावळेतील गृहनिर्माण सोसायटीधारकांनी केला.
अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासह भाजप व मित्रपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी वाकडमध्ये म्हातोबा मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेला सुरूवात केली. प्रत्येक गृहनिर्माण सोसायट्यांच्या दारात जाऊन मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या या संवाद पदयात्रेला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाकडमधील काळाखडक परिसर हा प्रामुख्याने झोपडपट्टीचा म्हणून गणला जातो. कोरोना काळात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या मदतीची आठवण झोपड्पट्टीवासीयांनी अश्विनी जगताप यांना सांगत लक्ष्मणभाऊंनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्यांनी वाकड आणि पुनावळेतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांना भाजपसोबत येण्याचे आवाहन केले. सोसायट्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. त्यांच्या या स्वप्नाला आपण सर्वांनी मजबूत करणे गरजेचे आहे. तसे झाले तरच आपला विकास होणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनीही चिंचवड मतदारसंघात विकास, विकास आणि फक्त विकासच केला आहे. त्यामुळे आपण मतदारांनी कमळाला साथ द्यावी. मला भरघोस मतांनी विजयी करावे, असे अवाहन अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मतदारांना केले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी गृहनिर्माण सोसायट्यांच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोफत टँकर उपलब्ध करून दिल्याचेही अश्विनी जगताप यांनी सांगितले.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा ममता गायकवाड, संतोष लोंढे, माजी नगरसेवक संदिप कस्पटे, विनायक गायकवाड, विशाल कलाटे, राम वाकडकर, कुणाल वाव्हळकर, स्नेहा कलाटे यांच्यासह भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.