बातम्यामहाराष्ट्र

क्रिकेट खेळताना पंकजा मुंडेंनी मारला षटकार, कार्यकर्त्यांनी वाजवल्या टाळ्या अन् शिट्ट्या


परळी – तहसील कार्यालयासमोरील मैदानात शुक्रवारपासून सीएम चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बॅटींग आणि बॉलिंगद्वारे खेळाचा आनंद घेतला. नेहमीच राजकीय मैदानावर फटकेबाजी करणाऱ्या पंकजा यांची ही खेळी पाहून कार्यकर्तेही अवाक झाले.  आमदार आर. टी. देशमुख यांनी गोलंदाजी करण्यासाठी बॉल हाती घेतला. त्यांनी नेहमीप्रमाणे सहजच बॉल टाकला आणि पंकजा मुंडेंनी उत्तुंग षटकार ठोकला. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपण राजकीयच नाही, तर क्रिकेटच्या मैदानावरही उत्कृष्ट खेळाडू असल्याचं पंकजा यांनी दाखवून दिलें. पंकजा यांचा हा षटकार पाहून उपस्थित नेते अन् कार्यकर्त्यांनी टाळ्या-शिट्ट्या वाजवल्या.

परळीत सध्या भाजपच्या वतीने सीएम चषक भव्य कला व क्रीडा महोत्सवाची धूम सुरू आहे. या उपक्रमावर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची निर्विवाद छाप उमटली असून त्यांच्यामुळे शहरातील सांस्कृतिक चळवळीला गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

या महोत्सवातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते नुकतेच झाले. तर आज जिजामाता उद्यानात चित्रकला व वैद्यनाथ महाविद्यालयाच्या बसवेश्वर वसाहती मधील ट्रेकींग ट्रॅकवर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतच्या सुमारे तीन हजार मुलांनी तर धावण्याच्या स्पर्धेत साडेतीनशे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.

शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विविध स्पर्धांमध्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेवून स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रकलेतून ‘बेटी बचाव’ चा सामाजिक संदेशही यानिमित्ताने दिला.

चित्रकला स्पर्धा तीन गटांमध्ये विभागून घेण्यात आल्या. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आवडेल ते चित्र काढले तर इतरांनी स्वच्छ भारत अभियान, वृक्षारोपण, निसर्गचित्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूण हत्या विषय घेवून बेटी बचाव चा संदेश चित्रातून दिला. धावण्याची स्पर्धा शंभर व चारशे मीटर अशा दोन गटांत घेण्यात आली.

पंकजा मुंडे यांनी शहरात अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थी व युवकांच्या क्रीडा व कला गुणांना वाव तर दिलाच आहे शिवाय शहरात एका चांगल्या संस्कृतीची जोपासना करण्याचे काम केले आहे. क्रिकेट स्पर्धे बरोबरच चित्रकला, रनिंग, रांगोळी, कबड्डी, कुस्ती आणि व्हाॅलीबाॅल याही स्पर्धेचे आयोजन भाजपने केले आहे

Share this: